मुंबईः गुन्ह्यांत मदत करण्यासाठी व चारचाकी गाडी सोडवण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली सहाय्यक फौजदार सुनील महादेव देसाई (५१) व पोलीस शिपाई विक्रम अतुल शेंडगे (३१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. दोघेही बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दोन्ही आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची एसीबी कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

याबाबत एसीबीकडून मिळालेल्या माहिनुसार, तक्रारदारांच्या विरोधात अपघात केल्याप्रकरणी १६ मार्च, २०२५ रोजी बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेली तक्रारदाराचे चारचाकी वाहन सोडवण्यासाठी आरोपी सहाय्यक फौजदार सुनील देसाई याने लाचेची मागणी केली होती. पण तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी मंगळवार, १८ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग येथे जाऊन तक्रार केली.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनीही तात्काळ तक्रारीची नोंद करून याप्रकरणी तक्रारदारांनी केलेल्या आरोपींची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगलवारी एसीबीकडून पडताळणी करण्यात आली. त्यावेळी देसाई यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागमी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी सुरूवातीला ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले. पडताळणीनंतर एसीबीने तात्काळ सापळा रचला. त्यावेळी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई विक्रम शेंडगे यांना पकडण्यात आले.

ही रक्कम त्यांनी देसाईच्या सांगण्यावरून घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७,१२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी दोघांनाही मंगळवारी अटक करण्यात आली. अटकेच्या कारवाईनंतर एसीबीने दोन्ही पोलिसांना याप्रकरणी न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने याप्रकरणी दोन्ही आरोपींना दोन दिवसांची एसीबी कोठडी सुनावली. याप्रकरणी एसीबी अधिक तपास करीत आहे.

मुंबईत ११ गुन्हे दाखल

भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरोधात तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे. यावर्षी मुंबई एसीबीने आतापर्यंत ११ गुन्हे दाखल केले आहेत. त्यात लाच मागितल्याच्या तक्रावरून सापळे रचून कारवाई करण्यात आली आहे. सर्व गुन्हे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत.