दोन वेगळ्या घटनांमध्ये उपनगरी रेल्वेची धडक लागून शनिवारी दोन रेल्वे कर्मचाऱ्यांसह चौघांचा मृत्यू झाला. यात एका महिलेचा समावेश आहे.
हार्बर मार्गावरील अंधेरी येथून दुपारी ३.१५ वाजता सुटलेल्या उपनगरी रेल्वेचा धक्का मार्गात काम करीत असलेल्या दोघा गँगमनना लागला, त्यात शेषराव हा गँगमन जागीच ठार झाला; तर वीरेंद्रकुमार सिंह याचे सायंकाळी उशिरा कूपर रुग्णालयात निधन झाले. या गाडीचे मोटरमन डी. के. बन्सल यांनी अपघात होताच गार्डला खाली उतरून ते पाहण्यास सांगितले. गार्ड खाली उतरताच कामगारांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. बन्सल त्याला सोडविण्यासाठी गेले, तेव्हा संतप्त लोकांनी त्यांच्याकडे मोर्चा वळविला. काहीजणांकडून दगडफेकही होऊ लागली. अखेर बन्सल यांनी लोकांची हात जोडून माफी मागितली. अखेरीस ते चक्क रेल्वे रुळांवर झोपले. त्यानंतर मात्र सारा जमाव शांत झाला. तोपर्यंत सहायक आयुक्त दत्तात्रय सिदाम आणि वरिष्ठ निरीक्षक ढोले घटनास्थळी पोहोचले होते. दुसरा अपघात ट्रान्स हार्बर मार्गावरील घणसोली रेल्वे स्थानकाजवळ झाला. ठाण्याकडे जाणाऱ्या गाडीच्या धडकेने रेल्वे मार्ग ओलांडणारे दोघे जण ठार झाले. त्यात एका महिलेचा समावेश असून, त्यांची ओळख पटलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा