लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : पियूष गोयल आणि उदयनराजे भोसले या राज्यसभा सदस्यांची लोकसभेवर निवड झाल्याने या रिक्त झालेल्या दोन्ही जागा भाजप स्वत:कडे कायम ठेवणार की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा केल्याप्रमाणे एक जागा या पक्षाला सोडणार याची उत्सुकता आहे.
राज्यसभेचा सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यास त्याचे सदस्यत्वपद आपोआपच रद्द होते. राज्यातून राज्यसभेवर प्रतिनिधीत्व करणारे पियूष गोयल आणि उदयनाराजे भोसले यांची अनुक्रमे उत्तर मुंबई व सातारा मतदारसंघांमधून लोकसभेवर निवड झाली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार गोयल आणि भोसले या दोघांचे राज्यसभेचे सदस्यत्वपद आपोआपच रद्द झाले आहे.
हेही वाचा >>>मुंबई: एका दिवसात सुमारे ३१६ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ, स्वच्छता मोहिमेबाबत पालिकेचा दावा
लोकसभेच्या जागावाटपात महायुतीमध्ये अजित पवार गटाला चारच जागा वाट्याला आल्या होत्या. गोयल यांची रिक्त होणारी जागा आम्हाला देण्याचा शब्द भाजप नेतृत्वाने दिला असल्याचा दावा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. यानुसार भाजप ही जागा राष्ट्रवादीला देणार का, हा प्रश्न आहे. अजित पवार गटाचा दारुण पराभव झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीला फारसे महत्त्व देण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. यामुळेच आणखी चार वर्षे मुदत असलेली गोयल यांची जागा भाजप राष्ट्रवादीला सोडण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते.
राज्यसभेच्या दोन्ही रिक्त जागांबाबत दिल्लीच्या पातळीवरच निर्णय होईल, असे भाजपच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
नियम काय सांगतो ?
विधानसभा आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यास भारताच्या राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या मुदतीत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. या मुदतीत राजीनामा न दिल्यास त्याची लोकसभेची जागा आपोआपच रिक्त होते. १९९९ मध्ये पंजाबमध्ये विधानसभा सदस्य गुरुचरणसिंग तोहरा यांनी लोकसभेवर निवडून येऊनही १४ दिवसांत राजीनामा दिला नव्हता. परिणामी त्यांची लोकसभेची जागा रिक्त झाली होती. राज्यसभा किंवा विधान परिषद सदस्य लोकसभा वा विधानसभेवर निवडून आल्यास सदस्यत्व आपोआपच रद्द होते.
लोकसभेत निवडून आलेले विद्यामान लोकप्रतिनिधी
पियूष गोयल (भाजप) – राज्यसभा
उदयनराजे भोसले (भाजप ) – राज्यसभा
लोकसभेवर निवडून गेलेले आमदार
बळवंत वानखडे (अमरावती, काँग्रेस), प्रणिती शिंदे (सोलापूर, काँग्रेस), संदिपान भूमरे (औरंगाबाद, शिवसेना शिंदे गट), रविंद्र वायकर (वायव्य मुंबई, शिवसेना शिंदे गट), वर्षा गायकवाड (उत्तर मध्य मुंबई काँग्रेस), प्रतिभा धानोकर (चंद्रपूर, काँग्रेस)