रस्त्यालगत उभी केलेली वाहने चोरून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपी सराईत चोर असून त्यांच्याकडून पोलिसांनी सहा रिक्षा आणि एक दुचाकी हस्तगत केली.
काही दिवसांपूर्वी चेंबूरच्या टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरातून अझर खान (३०) याची दुचाकी आज्ञात इसमाने चोरली होती. याबाबत त्याने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याचदरम्यान शफीक खान (२१) आणि सगीर अहमद (२७) या दोन सराईत चोरांनी अझरची दुचाकी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातून शफीक आणि सगीर या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि भांडुप, टिळकनगर, शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सहा रिक्षा चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील सहा रिक्षा हस्तगत केल्या आणि या दोघांना अटक केली.