मुंबई: चेंबूरमधील डायमंड उद्यान परिसरात बुधवारी रात्री नवी मुंबई येथील एका व्यवसायीकावर दोघांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखा आणि परिमंडळ ६ च्या पथकांनी तपास करून दोन आरोपीना अटक केली. जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बेलापूर परिसरात वास्तव्यास असलेले व्यावसायिक सद्रुद्दीन खान (५०) बुधवारी रात्री १० च्या सुमारास धारावी येथून नवी मुंबईच्या दिशेने जात होते. चेंबूरमधील डायमंड उद्यान परिसरात शीव – पनवेल मार्गावर त्यांची मोटारगाडी थांबली होती. त्यावेळी दुचाकीवरून तेथे आलेल्या दोघांनी त्यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात खान यांच्या गालाला एक गोळी लागली आणि गंभीर जखमी झाले.

यावेळी खान यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चेंबूर पोलिसांसोबतच गुन्हे शाखा या हल्ल्याचा समांतर तपास करीत होती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी संताक्रूज परिसरातून फिरोज खान (५४) याला अटक केली.

परिमंडळ ६ च्या पथकाने धारावी परिसरातून अफजल खान (२०) याला अटक केली. आरोपी दोघेही मामा-भाचा असून जमिनीच्या वादातून त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच याप्रकरणात अन्य काही व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करीत आहेत.