मुंबई : स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्ग मेट्रो ६ मार्गिकेच्या कंजूरमार्गमधील कारशेडच्या कामाला मे-जूनमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सुरुवात करणार आहे. या कामासाठी मागविण्यात आलेल्या निविदा लवकरच अंतिम होणार आहे. दोन कंपन्यांनी आर्थिक निविदा सादर केल्या असून यात सर्वात कमी बोली सॅम इंडिया बिल्टवेल कंपनीची आहे. त्यामुळे या कंपनीला कंत्राट मिळण्याची शक्यता आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना मेट्रोने जोडण्यासाठी एमएमआरडीएने १५.३१ किमीच्या मेट्रो ६ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. १३ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या आणि ६६७२ कोटी खर्चाच्या या मार्गिकेमुळे लोखंडवाला येथून विक्रोळीला काही मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. या मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरु असून २०२५ मध्ये ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. दरम्यान या मार्गिकेची कारशेड कांजूरमार्ग येथे प्रस्तावित होती. मात्र मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीपझ) कारशेडच्या वादाचा फटका मेट्रो ६ ला बसला. कारशेडची जागा ताब्यात घेणे वा काम सुरु करणे एमएमआरडीएला शक्य झाले नाही. पण आता मात्र कारशेडचा वाद मिटला असून कांजूरमार्गची १५ हेक्टर जागा मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडसाठी ताब्यात घेतली आहे. ऑक्टोबरमध्ये या कारशेडच्या कामासाठी ५०८ कोटी रुपये खर्चाची निविदा जारी करण्यात आली होती.
हेही वाचा – ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’चे दुसरे पर्व १५ फेब्रुवारीला
या निविदा प्रक्रियेनुसार सोमवारी आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून दोन कंपन्यांनी यासाठी निविदा सादर केल्या आहेत. सॅम इंडिया बिल्टवेल आणि अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स लिमिटेड अशा निविदा सादर करणाऱ्या दोन कंपन्या आहेत. सॅम इंडिया बिल्टवेलने सर्वात कमी ५४७ कोटी रुपयांची बोली लावली आहे. तर अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स लिमिटेडने ६०८ कोटी रुपयांची बोली लावली आहे. आता लवकरच निविदा अंतिम होणार असून सर्वात कमी बोली लावणाऱ्या सॅम इंडिया बिल्टवेलला कंत्राट बहाल केले जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल आणि पावसाळ्यापूर्वी कामास सुरुवात केली जाईल. तर कंत्राट मिळणाऱ्या कंपनीला कारशेडमध्ये मुख्य डेपोच्या स्टॅबलिंग यार्ड, डेपो नियंत्रण केंद्र, ऑपरेशन नियंत्रण केंद्र, प्रशाकीय इमारत, देखभाल कार्यशाळा इमारत, सहाय्यक सबस्टेशन, रस्ता, सेवा वाहिनी इत्यादी कामे करावी लागणार आहेत. नियुक्त कंत्राटदाराला २४ महिन्यांत कारशेडचे काम पूर्ण करावे लागणार आहे.