मुंबई : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने सफाई कामगारांच्या शहर आणि उपनगरांतील धोकादायक वसाहती रिकाम्या करण्यास सुरुवात केली असून ३१ ऑगस्टपर्यंत तब्बल दोन हजार १०९ सफाई कर्मचाऱ्यांना वसाहतीमधील घर रिकामे करावे लागणार आहे. विस्थापन भत्त्यापोटी १४ हजार रुपये आणि मुळ वेतनाच्या २० टक्के घरभाडे देण्याची तयारी दर्शवत प्रशासने सफाई कामगारांना पर्यायी घर शोधण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण मुंबईतील वसाहतीत राहणाऱ्यांना याच परिसरात १४ हजार रुपयांमध्ये भाड्याचे घर मिळेनासे झाले असून सफाई कर्मचारी कमालीचे तणावाखाली आहेत.
दूरवर वास्तव्यास गेल्यानंतर भल्यापहाटे सफाईसाठी दक्षिण मुंबईत कसे पोहोचायचे असा प्रश्न कामगारांपुढे ठाकला आहे. मुंबईत साफसफाई करण्यासाठी सफाई कामगारांना भल्या पहाटेच घर सोडावे लागते. कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता यावे यासाठी सफाई कामगारांची जवळच्या वसाहतीमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सफाई कामगारांच्या तब्बल ३९ वसाहती असून त्यापैकी काही ब्रिटिशकालीन आहे. या वसाहती जीर्ण होऊन धोकादायक बनल्यामुळे त्यांच्या जागी टोलेजंग इमारती उभारून सफाई कामगारांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. त्यासाठी आश्रय योजना आखण्यात आली. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या दफ्तर दिरंगाईमुळे आश्रय योजनेचे काम संथगतीने सुरू होते. महानगरपालिकेने ३९ पैकी ३० वसाहती तातडीने रिकाम्या करून आश्रय योजनेची मुहूर्तमेढ रोवण्याचा निर्णय घेतला होता. या ३० वसाहतींमध्ये एकूण ३,१३४ सफाई कामगारांची कुटुंबे वास्तव्याला होती. त्यापैकी १,०६५ कुटुंबाचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे. तर काही कुटुंबांच्या निवाऱ्याची व्यवस्था महानगरपालिकेच्या संक्रमण शिबिरांमध्ये करण्यात आली होती. उर्वरित २,१०९ सफाई कामगारांना १४ हजार रुपये विस्थापन भत्ता आणि मुळ वेतनाच्या २० टक्के घरभाडे देण्याची तयारी दर्शवत प्रशासनाने अन्यत्र पर्यायी घर शोधण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर त्यांना परतफेडीच्या अटीवर ७५ हजार रुपये देण्यात आले असून त्याचे मासिक हफ्ते कामगारांच्या वेतनातून कापण्यास सुरुवात झाली आहे.
सुमारे ५० टक्के सफाई कामगार भाड्याच्या घरात वास्तव्याला गेले आहेत. पण उर्वरित कामगारांना भाड्याचे घर मिळत नसल्याने ते तणावाखाली आहेत. सफाई कामगारांच्या वसाहतीचे प्रकरण उच्च न्यायालयात असून न्यायालयानेही ३१ ऑगस्टपर्यंत वसाहतीतील घर रिकामे करण्याचे आदेश सफाई कामगारांना दिले आहेत. महानगरपालिकेच्या वसाहतीमधील १२० चौरस फुटाच्या घरात सफाई कामगार कुटुंब कबिल्यासह वास्तव्यास असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या अधिक आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना सफाई कामगार मेटाकुटीस आलेले आहेत. आता कामाच्या ठिकाणी भाड्याचे घर घेण्यासाठी महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या रकमेत पदरमोड करून भर घालावी लागणार आहे. अन्यथा दूरवरच्या उपनगरांत वास्तव्य करावे लागणार आहे. मग कामाच्या ठिकाणी भल्या पहाटे कसे पोहोचायचे असा प्रश्न कामगारांना पडला आहे.
तर निधीची बचत झाली असती
सफाई कामगारांच्या २० वसाहती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. या भूखंडावर बहुमजली इमारती बांधून तेथे सफाई कामगारांच्या निवाऱ्याची सोय करावी आणि मग उर्वरित वसाहती जमीनदोस्त कराव्या, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसे केल्यास विस्थापन भत्त्यापोटी खर्च होणारे कोट्यवधी रुपये वाचतील ही बाब कामगारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्याकडे काणाडोळा करण्यात येत आहे. उलटपक्षी कोणत्याच सुविधा नसलेल्या सफाई कामगारांना चेंबूरमधील व्हीडीओकॉन नगरमध्ये पाठवणी करण्याचा घाट घालण्यात येत आहे.
संक्रमण शिबिरांवरही हातोडा
आश्रय योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी मुंबईमधील सफाई कामगारांच्या काही वसाहतींच्या भूखंडावर एका बाजूला संक्रमण शिबीर बांधण्यात आली होती. या संक्रमण शिबिरातील छोट्या सदनिकांमध्ये सफाई कामगारांची तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आता ही संक्रमण शिबिरेही जमीनदोस्त करण्यात येणार असून तेथे वास्तव्याला असलेल्या कामगारांना विस्थापन भत्ता देऊन घर रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे संक्रमण शिबिरांची उभारणी करण्यासाठी खर्च केलेला निधी वाया गेल्याची टीका होऊ लागली आहे.