मुंबई : कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या जुन्या प्रकारातील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) डब्यांसह धावणाऱ्या दोन लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आता आधुनिक प्रणालीच्या लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डब्यांसह धावणार आहेत. जामनगर – तिरुनेलवेली – जामनगर द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस आणि हापा-मडगाव साप्ताहिक एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आणि वेगवान प्रवासासाठी जुन्या प्रकारातील आयसीएफ डब्याचे रुपांतर एलएचबी डब्यात केले जात आहे. भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात ही प्रक्रिया सुरू असून, शेकडो रेल्वेगाड्या एलएचबी डब्यांसह धावत आहेत. आता कोकण रेल्वेवरील एलएचबी डबे असलेल्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे.
हेही वाचा – सामान्यांसाठी दोन लाख घरे, निर्मितीचा म्हाडा उपाध्यक्षांचा संकल्प
हेही वाचा – मुंबई : घरांचा साठा रोखणारे ‘म्हाडा’चे दोन निर्णय अद्यापही अस्तित्वात!
गाडी क्रमांक १९५७८ जामनगर- तिरुनेलवेली एक्सप्रेस २६ ऑगस्टपासून आणि गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर २९ ऑगस्टपासून एलएचबी डब्यांसह धावणार आहे. गाडी क्रमांक २२९०८ हापा – मडगाव ३० ऑगस्टपासून, तर गाडी क्रमांक २२९०८ मडगाव – हापा एक्स्प्रेस १ सप्टेंबरपासून एलएचबी प्रकारातील डब्यांसह धावणार आहे. एलएचबी डबे जोडल्याने दोन्ही रेल्वे गाड्यांच्या डब्याच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे एक शयनयान डबा कमी झाला आहे. तृतीय श्रेणीतील डब्यांमध्ये ९ प्रवाशांची आसनाची संख्या वाढली आहे. सुधारित डब्यांच्या संचनेनुसार वातानुकूलित द्वितीय श्रेणी २ डबे, वातानुकूलित इकॉनॉमी तृतीय श्रेणीचे ६ डबे, ८ शयनयान डबे, सामान्य ३ डबे, जनरेटर कार एक डबा, एसएलआर डबा एक, पॅन्ट्री कार एक असे एकूण २२ डबे असणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.