मुंबईतील छोटय़ामोठय़ा गल्लीबोळात रुग्णवाहिका पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी व त्यामुळे रुग्णाच्या जिवाला निर्माण होणारा धोका या पाश्र्वभूमीवर प्रथमोपचाराची सोय असलेली दुचाकी रुग्णवाहिका मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत अशा १२ दुचाकी रुग्णवाहिका मुंबईच्या रस्त्यांवर दिसतील, अशी माहिती देण्यात आली.
मुंबईतील अरुंद रस्ते किंवा छोटय़ा गल्ल्यांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचण्यात अडचणी येतात. या पाश्र्वभूमीवर मुंबईत दुचाकी रुग्णवाहिका आणण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने जून २०१५ मध्ये मांडला होता. गेल्या आठवडय़ात झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे येत्या महिनाभरात या रुग्णवाहिका मुंबईकरांच्या आरोग्य सेवेत रुजू होतील. सध्या कर्नाटक, गुजरातमध्ये दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
या रुग्णवाहिकेत प्राथमिक उपचारासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन मास्क, वेदनाशामक औषधे, मलमपट्टी आदी वस्तू उपलब्ध असतील. त्याशिवाय अपघात, हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर सुरुवातीच्या महत्त्वाच्या (गोल्डन) कालावधीतील आवश्यक असलेले उपचार पुरविण्यात येतील, असे राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले. या दुचाकीतील अनेक उपकरणे बॅटरीच्या साहाय्याने चालणारी असतील. या दुचाकी एरवी अग्निशमन दल, पोलीस ठाणी अशा ठिकाणी उभ्या राहतील, असेही डॉ. पवार यांनी नमूद केले. या दुचाकीत डॉक्टर उपलब्ध करून द्यायचा की कसे, याबाबत चर्चा सुरू असल्याचे या योजनेचे प्रमुख दिलीप जाधव यांनी सांगितले.
१०८
- क्रमांकावर फोन केल्यानंतर रुग्णाला आवश्यक वैद्यकीय गरज आणि त्याच्या ठिकाणी पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी यांचा विचार करून दुचाकी रुग्णवाहिका पाठवण्यात येणार आहेत.