मुंबई : मानखुर्द परिसरात बुधवारी सकाळी भरधाव वेगात धावणाऱ्या एका डंपरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला गंभीर जखमी झाला. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विक्रोळी परिसरात वास्तव्यास असलेला कुदीप सिंह गोहील (२३) बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास मित्र मुकेश चौधरी (२२) सोबत दुचाकीवरून नवी मुंबई येथे जात होता. वाशी खाडी पुलाआधी एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. डंपरची धडक बसताच दोघेही रस्त्यावर कोसळले. दुचाकीचालक कुलदीप सिंह याच्या अंगावरून डंपर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या मुकेशच्या हातावरून डंपरचे चाक गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गोहील आणि चौधरीला घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच कुलदीप सिंहचा मृत्यू झाला होता. मुकेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी फरार डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Story img Loader