मुंबई : शीव परिसरात सहा व आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरूणाविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलींची शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शीव परिसरात सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पीडित मुली खेळत होत्या. त्यावेळी आरोपी त्यांना एका वाहनामागे घेऊन गेला. त्यानंतर पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पीडित मुली घाबरल्या. त्यापैकी एका मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर याप्रकरणी धारावी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६५ (२) व पोक्सो कायद्यातील कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी शीव परिसरातील एका कारखान्यात कामाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.