गुजरात येथील भावनगरमध्ये राहणाऱ्या दोन तरुणांचा लोकलच्या धडकेमुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ठाणे-कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली असून, हे दोघे मित्रांसोबत नवी मुंबई येथील रबाळे भागातील एका कंपनीमध्ये मुलाखत देण्यासाठी रेल्वे रुळावरून जात असताना हा अपघात झाला. दाऊद हुसेन शेख (३०) आणि हजीबिल्ला मस्जीद (३५) अशी अपघातामध्ये मृत पावलेल्या दोघा तरुणांची नावे असून, हे दोघेही गुजरात भावनगरचे रहिवासी आहेत. हे दोघे आणि त्यांचे काही मित्र नोकरीच्या शोधात मुंबईत आले होते व पायधुनी भागामध्ये राहत होते. हे सर्व जण नवी मुंबई येथील रबाळे भागातील एका कंपनीमध्ये नोकरीकरिता मुलाखत देण्यासाठी मंगळवारी सकाळी ठाण्यात आले होते. सिडको भागात रिक्षाचालकांनी जास्त भाडे सांगितल्याने या सर्वानी रेल्वे रुळावरून रबाळेला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सर्व जण रेल्वे रुळावरून जात असताना कळवा खाडीजवळ लोकलची धडक बसून दाऊद खाडीत तर हजीबिल्ला रेल्वे रुळावर पडला.
दरम्यान, त्याच लोकलच्या मोटारमनने हजीबिल्ला यास कळवा स्थानकात नेले. त्यानंतर त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच दाऊदला खाडीतून बाहेर काढण्यात आले. मात्र त्याचाही मृत्यू झाला. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा