प्राध्यापकांचे सहकार्य नसतानाही तात्पुरते व कंत्राटी प्राध्यापक, गृहिणी, निवृत्त, माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने ‘तृतीय वर्ष वाणिज्य शाखे’ची (टीवायबीकॉम) शनिवारच्या विविध परीक्षा सुरळीतपणे घेण्यात महाविद्यालये व मुंबई विद्यापीठाला यश आले.
टीवायबीकॉमच्या बँकिंग अॅण्ड फायनान्स, कॉमर्स, अर्थशास्त्र, बिझनेस मॅनेजमेंट आदी विषयाची परीक्षा शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली. आंदोलनकर्त्यां प्राध्यापकांनी आपापल्या महाविद्यालयाबाहेर काळ्या फिती लावून मूकपणे निदर्शने केल्याने प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर परीक्षादरम्यान कोणताही संघर्ष उद्भवला नाही. तसेच, खासगी महाविद्यालये व कंत्राटी व तात्पुरत्या नेमणुकीवर असलेल्या प्राध्यापकांच्या मदतीने काही परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यास अडचणी आल्या नाहीत. परीक्षा सुरळीतपणे घेता याव्या परीक्षा विभागाने नेमलेल्या ५० कर्मचाऱ्यांचा ‘टास्क फोर्स’चीही मदत महाविद्यालयांना झाली. पण, परीक्षेच्या कामामध्ये शिक्षकांचा सहभाग नसल्याने काही महाविद्यालयांना शिक्षकेतर, निवृत्त, गृहिणी आदींच्या मदतीने परीक्षा घ्याव्या लागत आहेत.
टीवायबीकॉमच्या परीक्षेच्या कामात अडीच हजार जणांचा सहभाग असून त्यापैकी दोन हजार ११० हे शिक्षक आहेत. तर उर्वरित सुमारे ४०० जण शिक्षकी पेशाचे नाहीत, असा दावा विद्यापीठाने केला आहे. म्हणजेच शिक्षक नसलेले सुमारे ४०० जण सध्या टीवायबीकॉमच्या परीक्षेच्या कामात सहभागी आहेत.
दरम्यान परीक्षा विभागाने महाविद्यालयांकडून परीक्षेच्या कामात सहभाग नसलेल्या शिक्षकांची यादी मागविली होती. त्याला २० ते २५ महाविद्यालयांनी आतापर्यंत प्रतिसाद दिला असून तब्बल ३५० प्राध्यापकांची यादी विभागाला कळविली आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी दिली.
वेबलिंकने पेपर पाठविण्यास विरोध
परीक्षा केंद्रांवर एक तास आधी प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे पाठविण्याची पारंपारिक पद्धत डावलून वेब लिंकच्या माध्यमातून पाठविण्याच्या पद्धतीला प्राचार्यानी विरोध केला आहे. एकतर आधीच प्राध्यापकांच्या असहकारामुळे प्राचार्याना परीक्षा घेताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. त्यात वेब लिंकवरून प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून त्याच्या फोटोकॉपी करून विद्यार्थ्यांना वाटण्यास इतका वेळ लागतो आहे की अनेक परीक्षा केंद्रांवर गुरुवारी परीक्षा वेळेत सुरू करता आली नाही. त्यामुळे, या वर्षीपुरते तरी वेबलिंकने प्रश्नपत्रिका पाठविल्या जाऊ नये, असे ‘ अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य संघटने’चे अध्यक्ष प्रा. टी. ए. शिवारे यांचे म्हणणे आहे.
सध्या सर्वच प्रश्नपत्रिका विद्यापीठ पारंपरिक पद्धतीने पाठविते आहे. आयत्यावेळेस काही विषयाच्या प्रश्नपत्रिका वेबलिंकने डाऊनलोड करून घ्याव्या, असे परीक्षा केंद्रांवर कळविण्यात येते. परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी प्रश्नपत्रिका वेबलिंकने पाठविली जाते. सध्या तरी ज्या विषयाची विद्यार्थीसंख्या कमी आहे, अशाच विषयांबाबत वेबलिंकचा पर्याय आजमावण्यात येत आहे. परंतु, प्रश्नपत्रिकेच्या पानांची संख्याच इतकी जास्त असते की त्या डाऊनलोड होण्यास वेळ जातो. डाऊनलोड झाल्यानंतर प्रश्नपत्रिकांची प्रिंट काढून त्याच्या फोटोकॉपी काढाव्या लागतात. त्यानंतर या फोटोकॉपी विद्यार्थ्यांमध्ये वाटल्या जातात. पण, एका तासाच्या अवधीत प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून त्यांच्या फोटोकॉपी वाटणे शक्य होत नसल्याने परीक्षा वेळेत सुरू करता येत नाही. त्यात प्राध्यापकांच्या संपामुळे अनुभवी व्यक्ती या कामासाठी उपलब्ध होत नसल्याने ही प्रक्रिया आणखी लांबते. परिणामी या परीक्षेत वेबलिंकचा पर्याय टाळावा, अशी सूचना शिवारे यांनी केली. पेपर फुटल्यास किंवा अन्य प्रसंगी वेबलिंकचा वापर केला जावा, अशी सूचना त्यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा