मुंबई : ‘मी विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातील मतदार असून माझे पदवी प्रमाणपत्र खरे असल्याचा टोमणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता मारला. शिवसेना आणि मुंबईकरांचे वेगळे नाते असून ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले होते. पदवीधर मतदार कायमच शिवसेनेची साथ देतील, असे नमूद करीत ठाकरे यांनी कोकण पदवीधर व नाशिक शिक्षक मतदारसंघातील प्रश्न सुटला असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. अनिल परब यांच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यावेळी विविध मुद्द्यांवर बोलताना ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये कोणताही बिघाड झालेला नाही. विधानपरिषदेच्या काही जागांबाबत सुरुवातीला काँग्रेसबरोबर समन्वय नव्हता. वेळ वाया जाऊ नये, यासाठी आधी काही नेत्यांनी अर्ज भरून ठेवले होते. पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी नवी दिल्लीत बोलणी झाल्यावर कोकण आणि नाशिकबाबत समझोता झाला आहे.
हेही वाचा >>> पराभवाचे खापर आमच्यावर नको; ‘ऑर्गनायझर’मधील लेखावर राष्ट्रवादीची भूमिका
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर जम्मू व काश्मीरमध्ये तीन दिवसांमध्ये तीन दहशतवादी हल्ले झाले. राज्यघटनेतील ३७० कलम काढल्यानंतर तेथील परिस्थितीत कोणता फरक पडला? केंद्र सरकार केवळ विरोधकांना संपविण्यात वेळ वाया घालवीत आहे. मणिपूरच्या हिंसाचाराची माहिती संघाकडे वर्षभरानंतर पोचली आहे. आता सरसंघचालकांनी हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यावरही आपलेच ढोल वाजवत राहणार की मोदी तेथे जाणार, असा सवाल त्यांनी केला.
२८८ जागांची चाचपणी
ठाकरे यांनी राज्यातील संपर्क प्रमुखांची बैठक घेतली असून सर्व २८८ मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, प्रश्न व अन्य मुद्द्यांवर अहवाल मागविला आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप योग्य वेळी होईल. पण सर्व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत. मात्र त्यामुळे शिवसेना आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.