मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून (ठाकरे) स्वबळाचा सूर आळवला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून नमती भूमिका घेण्यात येत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याबाबत पुनर्विचार करतील. महाविकास आघाडी म्हणून महापालिका निवडणुकीला सामोरे जावे, असे आपल्याला वाटत असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> जात प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ; व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांना दिलासा
‘इंडिया’ आघाडी म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढलो. आजच्या स्थितीवरून त्यांना स्वतंत्र लढावे वाटत असेल तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मात्र महापालिकेमध्ये आघाडी व्हावी, असे आम्हाला वाटते. त्यांना स्वतंत्र लढायचे असेल तर आम्हीसुद्धा स्वतंत्र लढण्याची तयारी करू, असे वडेट्टीवार म्हणाले.
‘सत्ताधाऱ्यांचे गुन्हेगारांना संरक्षण’
वडेट्टीवार यांनी बीड आणि परभणी येथील घटनांवरही भाष्य केले. बीड महाराष्ट्रातील बिहार असल्याचे एका आयपीएस अधिकाऱ्याने म्हटल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला. मस्साजोग असो किंवा परभणी, पोलीस ज्या पद्धतीने वागले त्यावर पांघरूण घालण्याचे काम राज्याचे गृहमंत्री करीत आहेत. सत्ताधारी मंत्री गुन्हेगारांना संरक्षण देत असतील तर मात्र या घटना वाढत जातील, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.