मुंबई : शीव रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रियेत महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे आणि निविदा समिती जाणूनबुजून घोळ घालत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत गुरुवारी विधानसभेत सत्ताधाऱ्यांनीच सरकारला घरचा आहेर दिला.

या प्रश्नावरून भाजप आमदारांच्या आक्रमक भूमिकेनंतर निविदा प्रक्रियेत झालेल्या विलंबाची प्रशासकीय चौकशी केली जाईल. या चौकशीत कोणी अधिकारी दोषी आढळला तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा करत मंत्री उदय सामंत यांनी सत्ताधारी सदस्यांना शांत केले. तसेच मुंबईतील सर्व शासकीय रुग्णालयांच्या प्रश्नावर मुंबईतील आमदार आणि पालिका आयुक्तांसमवेत येत्या मंगळवारी बैठक घेऊन त्यात मार्ग काढण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

भाजप सदस्य कॅप्टन तामिळ सेल्वन यांच्यासह भारती लव्हेकर, यामिनी जाधव, आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, अजय चौधरी आदी सदस्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाचा पुनर्विकास आणि अन्य रुग्णालयातील त्रुटींबाबत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या चर्चेवर सामंत बोलत होते. निविदा प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास होऊ शकला नाही. या रुग्णालयात ३,६०० खाटांचे रुग्णालय करण्याची योजना होती. पण झाले नाही. त्यामुळे एका बेडवर दोन- दोन रुग्णांवर उपचार केले जात असून अतिदक्षता विभागातही अशीच भयावह परिस्थिती आहे.

हेही वाचा >>>ऐतिहासिक संदर्भ असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र : सरकारच्या निर्णयाने मराठा समाजात दुही

पालिका अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे आणि निविदा समिती या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात वेळ घालवत असून त्यामुळे रुग्णांचा नाहक बळी जात असल्याचा आरोप सेल्वन यांनी केला. त्यामुळे निविदा समितीचे प्रमुख शिंदे यांच्यावर रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. या वेळी भारती लव्हेकर यांनी ओशिवरा प्रसूतीगृह अन्य इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी केली तर यामिनी जाधव यांनी नायर रुग्णालयातील एमआरआय व सिटीस्कॅन यंत्रे बंद असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

शहरामध्ये महापालिका, वैद्याकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमध्ये सद्या:स्थितीत असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींची पुढील आठवड्यात मंगळवारी बैठक घेण्यात येईल. मुंबईतील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्धतेसाठी सरकार गंभीर असून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे सामंत यांनी सांगितले.

शीव रुग्णालयाचा पुनर्विकास दोन टप्प्यांत

शीव रुग्णालयाचा पुनर्विकास दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ६१६ कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून कार्यादेश देण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामाचे १५०७ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयाच्या व्यतिरिक्त नवीन जागेवर रुग्णालय बांधण्यात येत आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले रुग्णालय सुरूच राहणार आहे. शीव रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज सात हजार रुग्णांची नोंदणी होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

सामंत यांचे आदेश

नायर रुग्णालयातील दोन सीटीस्कॅन यंत्रे खरेदी करण्याबाबत आजच आदेश देण्यात येतील. ज्या भागात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करून बंद करण्यात आला असेल, सुविधा पुरविण्यात आल्या नसतील अशा ठिकाणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल. केईएम रुग्णालयाला १०० वर्षे होत आहेत. या रुग्णालयाच्या प्रस्तावावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.