एकीकडे राज्यातील प्रकल्प गेले म्हणून ओरडायचं आणि दुसरीकडे राज्यात येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करायचा, हा दुटप्पीपणा असून बारसू येथील नागरिकांना भडकवण्याचं काम काही लोकांकडून करण्यात येत आहे, अशी टीका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच बारसू प्रकल्पाबात राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “बारसूतील रिफायनरीविरोधात स्थानिक मरायला तयार असतील तर…”, संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हवा तेज में चल…”

नेमकं काय म्हणाले उदय सांमत?

“बारसू प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा जीडीपी ८.५ ने वाढेल असं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं. तसेच आम्ही या प्रकल्पासाठी १३ हजार एकर जमीन देऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता तेच या प्रकल्पाला विरोध करत आहेत. एकीकडे राज्यातील प्रकल्प गेले म्हणून ओरडायचं आणि दुसरीकडे राज्यात येणाऱ्या प्रकल्पांना विरोधा करायचा, हा दुटप्पीपणा आहे. बारसू येथील नागरिकांना भडकवण्याचं काम काही लोकांकडून करण्यात येत आहे. अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण कोणीही करू नये”, अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे.

“बारसूमध्ये होणारी रिफायनरी ही ग्रीन रिफायनरी आहे आणि सर्वेक्षण करून आठ दिवसांत तिथे रिफायनरीचं काम सुरू होईल, अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं जात आहे. हे चुकीचं आहे. सध्या केवळ मातीचं परीक्षण केलं जात आहे, त्यानंतर इथे रिफायनरी सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय होईल, यादरम्यान स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करता येईल”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा – “२०२४ मधील नेतृत्वाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार भाजपाच्या वरिष्ठांना”, बावनकुळेंच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

रिफायनरीबाबत स्थानिकांशी बैठक

“बारसूमध्ये होणाऱ्या रिफायनरीबाबत गेल्या आठ दिवसांत प्रशासनाने स्थानिकांबरोबर तीन बैठका घेतल्या आहेत. याबाबत उद्याही बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच विरोधकांनी केवळ विरोधाचं राजकारण न करता काही सुचना असतील तर त्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या”, असे आवाहनही त्यांनी केलं.

उदय सामंत घेणार राज ठाकरेंची भेट

पुढे बोलताना त्यांनी बारसू प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांनी भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. “राज ठाकरे यांची कोकणा सभा होणार आहे. त्यांनी बारसूमध्ये जाऊन येथील परिस्थिती समजून घ्यावी. अशी विनंती आम्ही राज ठाकरे यांना केला आहे. याबाबत आज मी राज ठाकरे यांची भेट घेणार आहे”, असेही त्यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant criticized uddhav thackeray group after oppose barsu refinery project spb
Show comments