मुंबई : मराठीच्या विश्वात मराठी शाळा या गाभारा आहेत, तर या गाभाऱ्यातील मूर्ती ही मराठी भाषा आहे. त्यामुळे मराठी शाळा टिकली, तर मराठी भाषा टिकेल हे अधोरेखित करून ‘गाभारा माय मराठी संस्कृतीचा’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘उद्भव’ या एकदिवसीय आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवाचे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या विलेपार्ले येथील म. ल. डहाणूकर महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळातर्फे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवाला विविध महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच बदलत्या काळानुसार मराठी शाळांच्या संख्येत होणारी घट व सातत्याने कमी होणारी पटसंख्या ही चिंताजनक बाब आहे. मात्र मातृभाषेतील शिक्षणामुळे एखाद्या विषयाची केवळ माहिती मिळण्याशिवाय ज्ञानातही भर पडत असते, त्यामुळे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमांच्या शाळेत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहनही करण्यात आले.

‘उद्भव’ महोत्सवात साहित्य कला विभागाअंतर्गत शब्दांचे सामर्थ्य दर्शविणारे वक्तृत्व, काव्यात्मक मुक्तप्रवाहाची चारोळी व निबंध, ज्ञानसम्राट, ललित कला विभागाअंतर्गत कल्पकतेची भरारी घेणारे डूडल आर्ट, विविधांगी रंगांचा आविष्कार असणारी रुमाल पेंटिंग व चित्रकला, सादरीकरण कला विभागाअंतर्गत स्वरांची जुगलबंदी, लोकस्पंदने उमटणारा नृत्याविष्कार, कलात्मकतेतून समाजक्रांती करणारा फॅशन शो, ‘उद्भव’चे शिलेदार, अनौपचारिक विभागाअंतर्गत छायाचित्रण, रील निर्मिती अशा वैविध्यपूर्ण स्पर्धांची मेजवानी विद्यार्थ्यांनी अनुभवली.

सर्वाधिक गुणांची कमाई करीत आणि पारितोषिके जिंकत सेंट झेविअर्स महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले आणि रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय उपविजेतेपदाचे आणि डी. जी. रूपारेल महाविद्यालय तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले. तर एच. आर. महाविद्यालयाच्या सिद्धी पाटील हिने सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रतिनिधीच्या पुरस्कारावर नाव कोरले. डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय भोळे, शिक्षक समन्वयक डॉ. राकेश पिसे, मृण्मयी वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मराठी वाङ्मय मंडळ अध्यक्ष सलोनी वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष ऋचा सुंकले, मुख्य संयोजक कृपा सावले आदी विद्यार्थ्यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे हा महोत्सव यशस्वीरित्या पार पडला.

Story img Loader