महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे, अशी भावना प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलीये. इंडिया टीव्हीवरील ‘आपकी अदालत’ कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर म्हणाले, दोघांनी स्वतंत्रपणे काम करू नये. त्यांनी एकत्र आले पाहिजे, असे मी त्यांना सांगितले होते. आपापसातील वाद त्यांनी मिटवले पाहिजेत.
राज ठाकरे यांनी २००६ मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापन केली होती. त्यानंतर सातत्याने राज आणि उद्धव यांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावे, अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा दोघांनी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. टाळी एका हातानी वाजत नाही. आम्हाला दोघांना समोर बसवून एकत्र येणार का, असे विचारा असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील सभेत आपण कोणाबरोबरही युती करणार नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यापार्श्वभूमीवर नाना पाटेकर यांनी व्यक्त केलेल्या भावनेमुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या दोघांशी आपले चांगले संबंध असल्याचेही नाना पाटेकर यांनी या मुलाखतीत सांगितले.
राज आणि उद्धवनी एकत्र आले पाहिजे : नाना पाटेकरची भावना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे, अशी भावना प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलीये.
First published on: 01-03-2013 at 03:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav and raj thackeray should patch up work together says nana patekar