राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसने कायमच तोडा आणि फोडा नीतीचा वापर केला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतंत्र तेलंगण निर्मितीचा उद्योग केंद्रातील काँग्रेसने आंध्रमधील जनतेच्या भावनांची दखल न घेता चालवला असून शिवसेना त्याला संसदेत विरोध करेल, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मांडली. तेलगु देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी या प्रश्नावर ‘मातोश्री’वर उद्धव यांच्याशी तासभर चर्चा केली त्यावेळी स्वतंत्र तेलंगणला उद्धव यांनी विरोध केला.
चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू यांची भलामण करताना, चंद्राबाबू पुन्हा रालोआमध्ये येतील, असा आशावाद उद्धव यांनी व्यक्त केला. केंद्रातील नवीन सरकारमध्ये चांगली माणसे एकत्र हवीत असेही ते म्हणाले. काँग्रेसवर टीका करताना काँग्रस तेलंगणप्रश्नी दोन दगडांवर पाय ठेवून स्वार्थाचे राजकारण करत असून हाच दगड काँग्रेसच्या डोक्यात घालण्याची वेळ आता आली असल्याचे उद्धव म्हणाले.  काँग्रेस आणि वायएसआर पार्टीचे मॅचफिक्सिंग सुरु असून यात आंध्रमधील जनतेला कोठेही विश्वासात घेण्यात आले नाही असे नायडू म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रद्वेष्टय़ा चंद्राबाबूंना पायघडय़ा – मनसे नाराज
महाराष्ट्र-आंध्रच्या सीमेवरील बाभळी प्रकल्पाला विरोध करून चंद्राबाबू नायडू महाराष्ट्रात ठिय्या मांडून बसले होते. त्यावेळी पोलिसांना हुलकावणी देऊन ते महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन आंदोलन करत बसले होते. अखेर त्यांना अटक करून आंध्रमध्ये पाठविण्यात आले तसेच विधानसभेतही त्यांच्यावर टीका झाली होती. अशा महाराष्ट्रद्वेष्टय़ा चंद्राबाबूंना आताच शिवसेना पायघडय़ा का अंथरते, हे न कळण्याऐवढी जनता दुधखुळी नाही, असे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav naidu team up against congress on telangana issue