मुंबई : कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट झाल्याने हे दोनही राजकीय नेते एकत्र येत असल्याच्या चर्चांना उधाण आले. राज ठाकरे यांचे भाचे यश देशपांडे यांच्या लग्न सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहिल्याने तसेच दोघांमध्ये संवाद रंगल्याने दोघे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली.
विधानसभा निवडणुकीत मनसेचा पार धुव्वा उडाला तर शिवसेनेचीही पीछेहाट झाली. यानंतर लगेचच ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. विधानसभा निवडणूक प्रचारात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पहिला गद्दार अशी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले होते.
हेही वाचा >>>मुंबईत महिनाअखेरीपर्यंत गारठा कायम राहणार
एकत्र येण्याविषयी निर्णय घेण्यास दोन्ही नेते सक्षम आहेत. घरगुती लग्नसोहळ्यात सर्व सगेसोयरे एकत्र येतात. ठाकरे बंधू त्या दृष्टीने एकत्र आले होते. भाजपच्या कपटी नीतीचा फटका यापूर्वी शिवसेनेने घेतला आहे. आता हा अनुभव मनसे घेत आहे. भाजपपासून चार हात लांब राहणे हे सर्वच मित्रपक्षांच्या फायद्याचे आहे.- विनायक राऊत, नेते, शिवसेना (ठाकरे)
या चर्चेपासून मी अलिप्त आहे. त्यामुळे या दोन भावांच्या संवादाबद्दल मी काहीही बोलणार नाही. मराठी माणसावर होणारा अन्याय मनसे सहन करणार नाही ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. – बाळा नांदगावकर, नेते, मनसे