फक्त बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनाप्रमुख. तेच हिंदुहृदयसम्राट ! ते एकमेव असल्याने दुसरा शिवसेनाप्रमुख होणे नाही. त्यांची जागा घेण्याची माझी योग्यता नाही. ‘शिवसेनाप्रमुख’ पद घेण्याचा विचारही मनाला शिवलेला नाही, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी पक्षाच्या मुखपत्रातील मुलाखतीत स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुखांची स्वप्ने साकारण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वचनबध्द असल्याच्या आणाभाका मातोश्रीवर काल बाळासाहेबांच्या दालनात झालेल्या बैठकीत शिवसेना नेत्यांनी घेतल्या. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखपद स्वीकारले नसले तरी याच बैठकीत त्यांना शिवसेनाप्रमुखपदाचे सर्वाधिकार देण्यात आले.
बाळासाहेबांनी दिलेल्या ताकदीवर शिवसेना उभी आहे. त्यांच्या मार्गावरून शिवसेना पुढे जाईल आणि मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी लढतच राहील, अशी ग्वाही उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. ‘शिवसेनाप्रमुख’ पदाच्या मुद्दय़ावर पडदा पडला असून आता शिवसेनेचे ‘अध्यक्ष’ पद उध्दव ठाकरे स्वीकारतील आणि कार्यकारी अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची निवड होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. शिवसेनेत संघटनात्मक पातळीवरही बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘शिवसेनाप्रमुख’ हे पद पक्षाच्या घटनेत नसले तरी ते संघटनेतील सर्वोच्च पद असून बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात ते उध्दव ठाकरे यांच्याकडे जाईल, अशी चर्चा होती. पण स्वत उध्दव ठाकरे यांनीच ही शक्यता फेटाळून लावली. ‘मातोश्री’वर शनिवारी झालेल्या बैठकीस ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, रामदास कदम, संजय राऊत आदी नेते हजर होते. शिवसेनाप्रमुख पदाचे सर्वाधिकार स्वीकारल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले.
‘सामना’ मुखपत्रातील मुलाखतीत उध्दव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कडवट शिवसैनिकांमुळे मी शिवसेनाप्रमुख आहे, असे बाळासाहेब म्हणत. शिवसैनिक आजही असल्याने शिवसेनाप्रमुखही आज आहेत. त्यामुळे त्यांच्यामागे ‘माजी शिवसेनाप्रमुख’ किंवा ‘प्रथम शिवसेनाप्रमुख’ असे निर्थक शब्द कधीच लागणार नाहीत. बाळासाहेब सदैव आपल्यात आहेत, असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे. बाळासाहेबांचे विचार आणि आखून दिलेली कामे यापासून मी तसूभरही मागे हटणार नाही.
समर्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी आकाशपाताळ एक करून ‘भगवा’ फडकावल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही. जनतेला आधार देईन, असे सांगून उध्दव ठाकरे यांनी राज्यभर दौरा करण्याची घोषणा केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा