मुंबईत स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यास शिवसेनेने दिलेली सशर्त मंजुरी राज्य शासनाच्या नाकी नऊ आणणार अशी चिन्हे दिसत आहेत. या योजनेस शिवसेनेचा विरोध कायम असून आम्ही सुचविलेल्या उपसूचना स्वीकारल्या नाहीत, तर हा प्रस्ताव आम्ही मान्य करणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला बजावले आहे.
मुंबई किंवा अन्य महापालिकांमध्ये स्मार्ट सिटी योजना राबविताना या महापालिकांची स्वायत्तता अबाधित राहिलीच पाहिजे, असेही ठाकरे यांनी ठणकावले. मुंबईचे नियंत्रण केंद्राच्या हाती जावे हे भाजपलाही मान्य होणार नाही, अशी पुस्तीही ठाकरे यांनी शिवसेना भवनात काही पत्रकारांशी बोलताना जोडली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सचिवालयावरील सीबीआयच्या छाप्यांबाबत मते नोंदवितानाही ठाकरे यांचा सूर काहीसा कडवटच होता. सीबीआयने केजरीवाल यांच्या कार्यालयावर घातलेले छापे हे सुडाचे राजकारण की भ्रष्टाचाराला विरोध हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल, पण जनता आता दुधखुळी राहिलेली नसल्याने, जे काही चालले आहे ते जनता पाहत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. स्वतंत्र विदर्भाची मागणी करून त्या मुद्दय़ावर ठाम राहणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याविरुद्धचा हक्कभंग प्रस्ताव अमान्य झाला असला तरी शिवसेना अणे यांच्या राजीनाम्याच्या मुद्दय़ावर ठाम आहे, असे ते म्हणाले.

Story img Loader