प्रामुख्याने राजकीय पक्ष व नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या पोस्टरबाजीमुळे मुंबई कमालीची विद्रूप होत असल्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने थेट पालिका आयुक्तांनाच २४ तासांत फलक न हटवल्यास गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली होती. त्यानंतर संपूर्ण मुंबईतील पोस्टर तात्काळ काढण्यात आली होती. मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांना दादरमध्ये पोस्टर लावण्यास परवानगी दिल्याचे शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले.
दादरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या हातून निसटल्यानंतर दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी मनोहर जोशी यांनी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सवानिमित्त  शेवाळे यांची होर्डिग्ज व बॅनर्स दादरमध्ये झळकली.
यातील एकाही बॅनरवर शिवसेना नेते मनोहर जोशी व महापौर सुनील प्रभू यांचे छायचित्र अथवा साधे नावही टाकण्यात आले नव्हते. याबाबत परदेश दौऱ्याहून परत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना विचारणा केली असता राहुल यांना आपणच परवानगी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे मनोहर जोशी यांनी सांगितले.
अनधिकृत पोस्टरबाजीमुळे मुंबई विद्रूप होत असल्याची खंत वेळोवेळी उद्धव व राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. काही वर्षांपूर्वी आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनर व होर्डिग्ज लावू नका, असा फतवाही उद्धव यांनी काढला होता. गेल्या वर्षी असाच फतवा त्यांचे चिरंजीव आदित्य यांनीही काढला होता. प्रत्यक्षात त्याची कधी अंमलबजावणी झाली नाही. आता न्यायालयाच्या आदेशाची दखल घेऊन पालिकेने या अनधिकृत होर्डिग्ज-बॅनरविरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला असून एकटय़ा ‘जी-उत्तर’ विभागात पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेची २६, मनसेची ७८, राष्ट्रवादीची आठ, काँग्रेसची चार व भाजपचे एक अनधिकृत होर्डिग होते. एकूण ३१ ठिकाणी ही होर्डिग्ज-बॅनर आढळून आले असून या विरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी वैयक्तिक नावानुसार तक्रार दाखल करायला सांगितल्यास तशी तक्रार दाखल केली जाईल, असे पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा