शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केले आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी शोकही व्यक्त केला आहे.

“ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची  मोठी  हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.  पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.”  अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली..

“प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच! नुकतेच त्यांचे १०० व्या वर्षात पदार्पण झाले, तेव्हा त्या सोहोळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचा योग आला आणि आज ते आपल्यात नाहीत. विश्वासच बसत नाही. बालपणापासून त्यांनी शिवचरित्र आणि शिवशौर्य सांगून बलशाली समाज घडविण्यात योगदान दिले. एक अमोघ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’सारखा चरित्रात्मक ग्रंथ,‘जाणता राजा’ महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा! बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि प्राण होता,” असे देवेंद्र फडणवीसांनी शोकसंदेशात म्हटलंय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray and ajit pawar rection on babasaheb purandare death hrc