मुंबई: देशात जाती-धर्मात तेढ निर्माण करून लोकांना आपापसात झुंजवण्याचे आणि सत्ता उपभोगण्याचे भाजपचे कारस्थान आहे. भाजपचे हिंदूत्व देशाची बदनामी करणारे असल्याने अशा परिस्थितीत स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी भाजपविरोधात सर्वाना एकत्र यावेच लागेल, अशी साद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी उत्तर भारतीयांना घातली. आपण एकत्र आलो नाही तर आपल्या देशातच आपल्याला गुलामगिरीत राहावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
गोरेगाव येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी आदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांचे जेव्हा वाईट दिवस होते, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना वाचवले होते, अशी आठवण ठाकरे यांनी सांगितली. सेना- भाजप युतीच्या काळात ही युती अन्य पक्षांसाठी अस्पृश्य होती. आम्हाला वाळीत टाकल्यासारखे होते. कोणी साथ देत नव्हते तेव्हा बाळासाहेबांनी कोणाचीही पर्वा न करता मोदींना वाचविले. बाळासाहेबांनी त्यांना वाचविले नसते तर ते आज जेथे बसलेत तेथे पोहोचलेच नसते असे ठाकरे म्हणाले.
शिवसेनेने मराठी- उत्तर भारतीय असा भेदभाव कधीच केला नाही. एकमेकांचा द्वेष करणारे आमचे हिंदूत्व नाही. आमच्यातील काही गळय़ात पट्टा घालून भाजपसोबत गेले असले तरी आपण भाजपची असली गुलामगिरी कदापि स्वीकारणार नाही, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
आपल्या सर्वाना सर्वसामान्यांच्या स्वप्नातील देश उभा करायचा असून आत्ता सर्वजण एकत्र आलो नाही तर स्वकीयच आपल्याला गुलामगिरीत ढकलतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
भाजपचे हिंदूत्व देशाला बदनाम करणारे!
आधी २०१४मध्ये भाजपने युती तोडली, म्हणून आम्ही आता तोडली. आम्ही तेव्हाही हिंदू होतो, आजही हिंदू आहोत, उद्याही राहू. आम्ही फक्त त्यांची साथ सोडली आहे. आम्ही हिंदूत्व सोडलेले नाही. भाजप म्हणजे हिंदूत्व नाही. ते आज जे हिंदूत्व चालवत आहेत ते आम्हाला मान्य नाही. त्यांचे हिंदूत्व देशाला बदनाम करणारे असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.