शिवसेना खासदार संजय राऊत यांना १०० हून अधिक दिवसांनी जामीन मिळाला. ते तुरुंगाबाहेर आल्यानंतर ठाकरे गटात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या एका मुलाखतीचा व्हिडीओ ट्वीट करत कोणीही असो, कोणालाही सोडणार नाही, असं म्हटलं. याबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरेंसमोर राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. ते गुरुवारी (१० नोव्हेंबर) मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “कोणालाही सोडणार नाही यात देवेंद्र फडणवीसही आले. फडणवीसांनी हे लक्षात ठेवावं. दिवस बदलत असतात. आजचा आणि उद्याचा दिवस यात फरक असू शकतो. त्यांच्या ट्वीटचा अर्थ हाच आहे की त्यात तेही आहेत किंवा असतील.”

“संजय राऊत यांच्या धाडसाचं कौतुक आहे”

उद्धव ठाकरेंनी संजय राऊत खूप जीवलग मित्र असल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, “संजय राऊत यांच्या जामिनानंतर आनंदाशिवाय दुसरी प्रतिक्रिया असू शकत नाही. या आनंदाबरोबरच संजय राऊत यांच्या धाडसाचं कौतुक आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, सामनाचे कार्यकारी संपादक आहेत आणि त्याचबरोबर माझे जीवलग मित्रही आहेत. मित्र तोच असतो जो संकटाच्या काळात न डगमगता लढत असतो. तसा हा लढणारा मित्र आहे.”

“केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत”

“आता स्पष्ट झालं आहे. काल न्यायालयाने जो निकाल दिला त्या न्याय देवतेचे मी आभार मानतो. या निकालपत्रात अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरिक्षणं त्यांनी नोंदवली आहेत. त्यामुळे हे जगजाहीर झालंय की केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. सरकार त्यांना ज्याच्या अंगावर जा म्हणाले त्याच्या अंगावर जात आहेत. बेकायदेशीरपणे जात आहेत आणि हे सर्व जग बघत आहे,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

“सरकार न्यायालयालाच बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर…”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मागील ८-१५ दिवसांमधील केंद्रीय कायदामंत्री रिजूजू यांची वक्तव्य आता केंद्र सरकार न्याय देवतेलाही आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे की काय असं दाखवणारी आहेत. त्यांनी न्यायवृदांवरच शंका उपस्थित केली आहे. एकूणच सर्वसामान्यांच्या आशेषा किरण न्यायालय असते. केंद्र सरकार न्यायालयालाच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर देशातील तमाम जनतेने त्याचा विरोध केला पाहिजे.”

“केंद्रीय कायदा मंत्रीच न्याय देवतेवर भाष्य करत आहे”

“न्याय देवतेवर भाष्य करणं हासुद्धा गुन्हा आहे. त्यावर केंद्रीय कायदा मंत्रीच भाष्य करत आहे. हा गुन्हा होऊ शकतो का याची दखल न्याय देवता घेईलच. पण एक नक्की की आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले, अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. बेकायदेशीर अटक केले जात आहे, केसेस केल्या जात आहेत,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

हेही वाचा : संजय राऊत देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, भाजपा आमदार भातखळकर म्हणाले, “खोके, गद्दार, खंजीर…”

“संजय राऊतांना पुन्हा खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो”

“न्यायालयाने दणका देऊनही पुन्हा संजय राऊत यांना नव्या खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. एवढ्या चपराकीनंतर लाच वाटण्याइतकं हे केंद्र सरकार संवेदनशील असतं, तर अशा घटना घडल्या नसत्या,” असंही त्यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray answer tweet of devendra fadnavis after sanjay raut get bail pbs
Show comments