मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे) तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना नववर्षात गुढी उभारा, गुढी कुठे उभारायची ते तुम्हाला माहीत आहे. कामाला लागा, असे आवाहन उपस्थित शिवसैनिकांना केले.दिवाळीनंतर महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तयारी सुरू केली आहे. मुंबईसह राज्यभरात यासाठी दौरे करण्यात येणार असून राज्यभरातील नेत्यांनाही त्या त्या ठिकाणच्या पालिकांबरोबरच मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.
गुढीपाडव्यानिमित्त वांद्रे पूर्व येथील आमदार वरुण सरदेसाई यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेल्या उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांची आठवण उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करून दिली.
आपल्याला हक्काचा आणि जनतेने निवडून दिलेला आमदार मिळाला आहे. त्याचा आपल्याला अभिमान आहे. वांद्रे पूर्व हा आपलाच इलाका असल्याचे सांगताना इथे कामेही दणक्यात करा, असे वरुण सरदेसाई यांना त्यांनी सांगितले. जनतेचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. तेच खरे बळ आहे. नवीन वर्ष सुरू झाले आहे, गुढी कुठे उभारायची हे आपल्याला माहीत आहे. आता त्या दिशेने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.