शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दादर या ठिकाणी असलेल्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी २२ जानेवारीचा कार्यक्रम जाहीर केला. २२ जानेवारीला रामाच्या मंदिरात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना मिळालं की नाही याविषयी चर्चा सुरु आहेत. तसंच शरद पवार यांनीही आपल्याला निमंत्रण मिळालं नाही असं म्हटलं आहे. अशात आता उद्धव ठाकरेंनी राम मंदिरांच्या उद्घाटन सोहळ्याच्या दिवसाचा म्हणजेच २२ जानेवारीचा त्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

६ जानेवारी हा माँचा जन्मदिवस असतो. दरवर्षी आम्ही अभिवादनासाठी येत असतो तसंच आजही अभिवादन करायला आलो आहोत. २३ जानेवारी हा माननीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. या वर्षी २३ जानेवारीला शिवसेनेचं शिबीर नाशिकला होणार आहे. तसंच त्या संध्याकाळी म्हणजेच २३ जानेवारीच्या संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब या ठिकाणी शिवसेनेची सभा आम्ही घेणार आहोत.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंना राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण का नाही? मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले…

नाशिकच्या राम मंदिरात जाणार आणि महाआरतीही करणार

“एक आनंदाची बाब ही आहे की २२ जानेवारी या दिवशी इतके वर्षे ज्यासाठी संघर्ष करावा लागला होता, जवळपास २५ ते ३० वर्षांनी न्यायालयाने राम मंदिरांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आम्ही २२ जानेवारीला नाशिकमधल्या काळाराम मंदिरात जाणार आहोत. या मंदिराच्या प्रवेशासाठी सानेगुरुजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संघर्ष करावा लागला. राम हा माझासुद्धा आहे सांगण्यासाठी त्यांनी संघर्ष केला होता. त्या काळाराम मंदिरात जाऊन आम्ही रामाचं दर्शन घेणार आहोत. २२ जानेवारीला संध्याकाळी ६.३० वाजता काळाराम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेणार त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी गोदावरी नदीची महाआरती करणार आहोत. प्रभू रामचंद्र पंचवटीत वास्तव्यास होते. त्यांच्या वास्तव्याने पूजित झालेला तो परिसर आहे. हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही गोदातीरी महाआरतीही घेणार आहोत.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

कुणाला निमंत्रण कुणाला नाही यात पडणार नाही

२२ जानेवारीला कोण कोण जाणार? कुणाला निमंत्रण? यामध्ये मी पडणार नाही कारण हा अभिमान आणि अस्मितेचा प्रश्न आहे, आपल्या सगळ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. राम मंदिराचं लोकार्पण हा पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा त्याला राजकीय रंग येऊ नये. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही अय़ोध्येलाही जाऊ. आत्ता मान-पान पाहण्याची वेळ नाही. ही एक अस्मिता जपण्याची गोष्ट आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray big announcement about ram temple and his nashik visit on 23 january scj
Show comments