मुंबई : जातीपातींमध्ये भिंती उभारून आणि दुहीची बीजे पेरून राजकीय पोळी भाजण्याचे कारस्थान भाजप करीत आहे. मराठा आरक्षणातही मोडता घालण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्यात केला. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत विधेयक आणून आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यथेच्छ टीका केली. ‘‘मराठा समाजाने प्रदीर्घ आंदोलन केले असून, आरक्षणाच्या मागणीसाठी युवक आत्महत्या करीत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे अमानुष अत्याचार करण्यात आला. आमच्याही सरकारच्या काळात आंदोलने झाली. पोलिसांना आदेश दिल्याशिवाय ते बळाचा वापर करीत नाहीत. माझ्या काळात मी कधीच पोलिसांना असे आदेश दिले  नव्हते. मग, जालना पोलीस अधीक्षकांना लाठीमाराचे आदेश सरकारमधून कोणी दिले आणि जालन्यातील ‘जनरल डायर’ कोण’’, असा सवाल करीत ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.

हेही वाचा >>> Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : धारावी गिळू देणार नाही! उद्धव ठाकरे यांचा इशारा

‘‘भाजप, रा. स्व. संघ किंवा जनसंघाने कोणत्याही चळवळीत वा लढय़ात भाग घेतला नव्हता. त्यांच्यावर लढण्याची वेळ कधीच आली नव्हती. भाजपची मंडळी ज्यांच्याबरोबर जातात त्यांचा सत्यानाश करतात. अशी ही विघ्नसंतोषी मंडळी मराठा आरक्षणात मोडता घालत आहेत’’, असा आरोप ठाकरे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून भगव्यात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मनोज जरांगे यांनी भाजपपासून सावध राहावे. भाजपने जातीपातींमध्ये किंवा नेत्यांमध्ये भांडणे लावली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या आदेशाविरोधात दिल्ली सरकारमधील बदल्यांचे अधिकार घेण्यासाठी भाजपने पाशवी बहुमताच्या जोरावर संसदेत विधेयक आणले. त्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठीही विधेयक मंजूर करून समाजाची मागणी पूर्ण करावी, असे मत ठाकरे यांनी मांडले.

भाजप कायम घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करते, त्याचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, ‘‘मी घराणेशाहीचा पाईक आहे. मला माझ्या घराण्याबद्दल अभिमान आहे. भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड त्यांच्या कर्तृत्वामुळे त्या पदावर आहेत. त्यांचे वडील यशवंतराव चंद्रचूड हेही कर्तव्यकठोर सरन्यायाधीश होते. इतिहासातील उदाहरणे पाहिली, तर हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन, पुतीन अशा सर्व जुलमी नेत्यांना जनतेने सुरूवातीला भरभरून पाठिंबा दिला होता. पण त्यांची राजवट कशी राहिली? ज्यांच्या आगेमागे कोणीही नाही, त्यांची खात्री काय? असा सवाल करीत ठाकरे यांनी त्यांची तुलना मोदी राजवटीशी केली. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी यांनी आघाडी सरकार उत्तम चालवले. खुर्ची डळमळीत असेल, तर जनतेच्या मतांनाही किंमत दिली जाते व लोकशाही व्यवस्था टिकते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेने एका पक्षाला पाशवी बहुमत देऊ नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

भाजप हा जगातील सर्वात मोठा व शक्तिशाली पक्ष असताना अन्य पक्षातील भ्रष्टाचारी व गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांना भाजपबरोबर का घेत आहेत, त्यांना या नेत्यांची गरज का वाटते, असा सवाल ठाकरे यांनी केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही नेत्यांची घराणी त्यांच्या पक्षासाठी झिजली. पण त्यांना आता उपऱ्या नेत्यांसाठी सतरंज्या उचलण्याचे काम करावे लागत आहे, हे भाजप व संघातील निष्ठावंत नेत्यांना मान्य आहे का, आणि यासाठी त्यांनी त्याग केला होता का, असे सवाल ठाकरे यांनी केले.

एका पक्षाला पाशवी बहुमत मिळाल्यास काय घडते, हे आपण पाहतोच आहोत. त्यामुळे आघाडी सरकार सत्तेत येणे आवश्यक आहे.

-उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख, उबाठा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray blame on bjp for creating obstacles in maratha reservation in dasara rally zws