राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरामच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपाला भरघोश यश मिळालं आहे. आता, मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा, असं आव्हान शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं आहे. तसेच, मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या ‘शिवालय’ कार्यालयाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “राजस्थान, छत्तीगसड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाला भरघोस यश मिळालं आहे. आता, मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा. एवढी तुमची लाट असेल, तर लोकसभेची एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. आमच्याही मनात काही शंका नको. सगळं वातावारण विरोधात आहे. एक्झिट पोल आणि उलटेपालटे करणारे निकाल लागत आहेत. मग, हे कसं घडलं? हा प्रश्न मतदारांना पडत असेल. ती शंका दूर करण्यासाठी एकच निवडणूक दम असेल, तर बॅलेट पेपरवर घ्या.”

हेही वाचा : “…तर निवडणुकीत देव-धर्माचे मुद्दे मांडल्यास तुम्ही आमच्यावर कारवाई करू शकत नाही”, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

“बॅलेट पेपरची मतमोजणी करण्यासाठी वेळ लागतो. लोकशाही आणि देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीला मतमोजणीसाठी दोन-तीन दिवस लागले, तर काय फरक पडतो. महापालिका निवडणूक एक-दोन वर्ष झालं पुढं ढकलण्यात आली आहे. त्यात वेळ जात नाही का?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : “बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या”; राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाच्या नेत्याचं उत्तर, म्हणाले, “जनादेश…”

“तुमच्यात हिंमत आणि आत्मविश्वास असेल, तर लोकसभेची निवडणूक देशभर बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवावी. नाही, तर मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा,” असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray challenge bjp mumbai corporation election after victory rajasthan madhya pradesh and chhatisgarh ssa
Show comments