मुंबई : मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. प्रथम सत्ताधारी महायुतीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर महाविकास आघाडी आपला चेहरा जाहीर करेल, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले. सर्वाधिक आमदार असतानाही भाजपने मुख्यमंत्रीपद का सोडले, असा सवालही त्यांनी केला. विशेष म्हणजे ठाकरे हेच स्वत: मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, यासाठी आग्रही होते.

महायुती सरकारच्या कारभाराबाबत ‘गद्दारांचा पंचनामा’ या महाविकास आघाडीने काढलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते झाले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरून महायुतीला वादात ओढले आहे. ‘‘महायुती सत्तेत आहे. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण आहे? सर्वाधिक आमदार असतानाही भाजपने मुख्यमंत्रीपद स्वत:कडे घेतले नाही. भाजपची यामागे भूमिका कोणती होती,’’ असा सवाल ठाकरे यांनी केला. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाची चित्रफीत दाखविण्यामागे कोणताही वेगळा हेतू नसल्याचे ते म्हणाले. भावी मुख्यमंत्री म्हणून पटोले यांचाही उल्लेख केला जात आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना विचारले असता ‘‘खुर्ची हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. आम्ही सारे एक आहोत. आमच्यात भांडणे होणार नाहीत. महायुतीचा पराभव करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे’’ त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे व नाना पटोले यांनी मांडलेल्या भूमिकेशी आमचा पक्ष सहमत आहे, असा खुलासा शरद पवार यांनीही केला.

हेही वाचा >>>Video : वडिलांचं छत्र हरपलं! बाबांना अखेरचा निरोप देताना झीशान सिद्दीकींनी फोडला टाहो, भर पावसातील व्हिडीओ व्हायरल

कायदा सुव्यवस्थेपासून महायुतीचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांमुळे प्रशासनही हतबल झाले आहे. पैशांच्या उधळपट्टीवर प्रशासनाने खंबीर भूमिका घेतल्याची माहिती आहे. मात्र त्याकडेही दुर्लक्ष केल्याचा आरोप पवार यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने विविध निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. पण एवढ्या कमी वेळेत या निर्णयांची अंमलबजावणी कशी होणार, असा सवालही त्यांनी केला. विविध जातींना खूश करण्यासाठी विविध महामंडळे नव्याने निर्माण केली जात आहेत. पण आधीच बरीच महामंडळे तोट्यात असल्याचे सांगत मविआ सरकारच्या काळात काही मंडळे बंद करण्यात आल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

सर्वसामान्य जनता या सरकारला विटली आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन करण्यासाठी राज्यातील जनता उत्सुक आहे. विधानसभेत लोकसभेच्या निकालाचीच पुनरावृत्ती होईल. हरियाणाच्या निकालाचा राज्यावर काही परिणाम होणार नाही. – शरद पवारअध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार)

Story img Loader