मुंबई : पीएम केअर फंडासह ठाणे, पुणे, नागपूर अशा सर्व महापालिकांमधील करोनाकाळातील व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करताना राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करणार नाही, असे वचन मेहबूबा मुफ्ती यांना दिले होते, असा दावाही ठाकरे यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सरकारने महापालिकेतील गैरव्यवहारांची चौकशी सुरू केली असून ठाकरे गटाने १ जुलै रोजी पालिकेवर मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. त्याच्या तयारीसाठी ठाकरे यांनी मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक शनिवारी दादर येथील शिवाजी मंदिरात घेतली. त्यावेळी त्यांनी मोदी-शहा, फडणवीस व भाजपवर जोरदार टीका केली.

महापालिकेतील करोनाकाळातील गैरव्यवहारांची चौकशी कराच, पण याच काळातील राज्यातील अन्य महापालिकांचीही चौकशी करण्यात यावी. अन्य राज्यांमध्ये करोना रुग्णांची वाईट अवस्था होती. उत्तर प्रदेशमध्ये तर गंगेत प्रेते सोडून देण्यात आली होती. तसे प्रकार महाराष्ट्रात झाले नाहीत. त्यामुळे करोनाकाळातील भाजपशासित राज्यातील कारभाराचीही चौकशी करावी, असे सांगून ठाकरे म्हणाले, पीएम केअर फंडाला अनेकांनी हजारो कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या. ही रक्कम कुठे गेली, त्याचा हिशोब केंद्र सरकार व भाजपने द्यावा. त्या काळात राज्याला पुरविलेले व्हेंटिलेटर्स निकृष्ट दर्जाचे व बंद पडलेले होते. हे पाप कोणाचे?  रेमडेसिविरचा काळाबाजार कोणी केला, महाराष्ट्राला किती साठा दिला आणि भाजपशासित अन्य राज्यांना किती दिला, याचा जाब केंद्राने द्यावा. अल्पकाळात लाखो रुग्णशय्यांसह प्राणवायू व अन्य सुविधा उभारल्या गेल्या, मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात करोना परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळली गेली, याचे देशातच नव्हे, तर जगभरात कौतुक झाले, ही भाजपची खरी पोटदुखी आहे.

मी पाटण्यातील बैठकीत मेहबूबा मुफ्ती यांच्याशेजारी मुद्दामच बसलो होतो, त्यातून काही गोष्टी समजल्या. आम्ही राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करण्यास पाठिंबाच दिला होता, पण भाजपने सत्ता मिळविण्यासाठी हे कलम रद्द न करण्याचे वचन मेहबूबा मुफ्ती यांना दिले होते. तेव्हा भाजपने हिंदूत्व सोडले होते का?  भाजपने त्यांच्याबरोबर सत्तेत गेलेले चालते, पण मी बैठकीत शेजारी बसलो, तर चालत नाही, असा सवाल करीत ठाकरे यांनी मेहबूबा मुफ्ती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मोदी व नवाज शरीफ आदींची छायाचित्रे दाखविली.

तुम्हाला शवासन करावे लागेल आपली कुटुंबे वाचविण्यासाठी विरोधकांनी ऐक्य घडविण्याबाबत पाटण्यात बैठक घेतल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. त्याचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, खालच्या पातळीवर जाऊन आमच्या परिवाराबद्दल बोलू नका. परिवार तुमचाही आहे. आम्ही तुमच्या परिवाराबद्दल बोलायला लागलो, तर तुम्हाला शवासन करून न बोलता पडून राहावे लागेल. आम्ही घरात घुसलो, तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही.

देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

मुंबई : मी, माझे कुटुंब आणि माझा भाजप परिवार ही एक खुली किताब आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही जर घरात घुसलो, तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही’,  असे प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले. मुख्यमंत्रीपदी राहिलेली व्यक्ती इतकी ‘बालबुद्धी’ असल्याबद्दल आश्चर्य वाटते, असे फडणवीस यांनी नमूद केले.

ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप’ संभाषणाचा उल्लेख ठाकरे यांनी केला, ते आरोपपत्राचा भाग असून न्यायालयीन कागदपत्रांचा भाग आहेत. आमच्याकडे लपविण्यासारखे काहीच नाही. तुम्हाला चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल, तर सामान्य शिवसेना कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्रीपद व मंत्रीपद घरात कसे ठेवले, मुंबईला कुणी लुटले, मृतांच्या टाळूवरील लोणी कोणी खाल्ले, पोलिसांना १०० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट कोणी दिले आदी मुद्दय़ांवर काढावे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray claimed bjp promised mehbooba mufti will not abolished article 3 zws