पंतप्रधान नरेंद्र मोदी असले तरी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मत मिळत नाही हे मान्य केलं आहे. हिंमत असेल तर मोदींच्या नावानं मतं मागून दाखवा. होऊन जाऊ द्या, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं होतं. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’मध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचे फोटो लावून निवडून आले आहेत. बाळासाहेब ठाकरे आमचे नेते असून, त्यांचा फोटो लावू. पण, शिवसेनेतील अनेक उमेदवारांनी उद्धव ठाकरेंचा मोठा आणि बाळासाहेबांचा छोटा आणि पंतप्रधानांचा मोठा फोटो लावला. त्यामुळे आता कसलं आव्हान देता.”

हेही वाचा : “गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यपाल खासगीत…”, कोश्यारींच्या पदमुक्तीच्या इच्छेवर देवेंद्र फडणवसींची प्रतिक्रिया

“शिवसेना सुद्धा उद्धव ठाकरेंची मालमत्ता…”

“बाळासाहेब ठाकरे ही उद्धव ठाकरेंची खाजगी मालमत्ता नाही आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्राची मालमत्ता आहे. शिवसेना सुद्धा उद्धव ठाकरेंची मालमत्ता नाही. ८० टक्के शिवसेना आणि शिवसैनिक एकनाथ शिंदेंबरोबर आले आहेत. खरी शिवसेना ती आहे,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

“किमान फोन करुन तुमच्याबरोबर यायचं नाही, हे…”

तसेच, “उद्धव ठाकरेंबरोबर कोणतेही वैर नाही. त्यांनी ‘मातोश्री’चे दरवाजे माझ्यासाठी बंद केले. माझा फोनही उद्धव ठाकरेंनी घेतला नाही. पाच वर्षे आपण ज्यांच्याबरोबर काम करतो, सरकार चालवतो. किमान फोन करुन तुमच्याबरोबर यायचं नाही, हे सांगायला हवं होतं. पण, तुम्ही ‘मातोश्री’चे दरवाजे माझ्यासाठी बंद केले. याचं मला दु:ख आहे,” अशी खंत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

“उद्धव ठाकरेंना माझा नमस्कार सांगा हे…”

“राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरेंचा विरोधक आहे. अतिशय ताकदीने उद्धव ठाकरेंना विरोध करणार आहे. परंतु, वैयक्तिक कोणतेही वैर नाही आहे. एका कार्यक्रमात रश्मी ठाकरे भेटल्या. त्यांच्याशी बोललो आणि उद्धव ठाकरेंना माझा नमस्कार सांगा हे म्हटलं. कारण, महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. त्यापलिकडे जाणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील कोणाला मिस करता? अशोक चव्हाणांकडे पाहून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

“कोणत्याही परिस्थितीत मला अटक करा अन्…”

“महाविकास आघाडीचं सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट माजी आयुक्त संजय पांडेंना दिलं होतं. मी काहीच केलं नव्हतं, ज्यामुळे ते जेलमध्ये टाकू शकतील. त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मला अटक करा. जेलमध्ये टाका असे आदेश महाविकास आघाडी सरकारचे होते,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray closed door matoshree home say dcm devendra fadnavis ssa