पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात देशभरातील विरोधकांनी मोट बांधली. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकारातून शुक्रवारी (२३ जून) देशातील १५ हून अधिक विरोधी पक्षांची बिहारमधल्या पाटण्यात बैठक झाली. त्यात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती शेजारी बसलेले पहायला मिळाले. त्यावरून भाजपाने सडकून टीका केली. त्यावर आता स्वतः उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलोय अशी टीका करत असाल, तर मग असे फोटो माझ्याकडेही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह तुमचे नेते आहेत की नाही? नवाज शरीफांबरोबर फोटो आहेत. मी माझ्याकडे तुमचा अल्बमच करून ठेवलाय. यांचं सगळं मुस्लीम प्रेम. मी फक्त मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो म्हणून तुम्ही माझ्यावर टीका करताय. मी मुद्दाम बसलो.”

“आधी मोदी, अमित शाह गुन्हेगार आहेत हे बोला”

“तुमचे नेतेही मेहबूबा मुख्तींबरोबर बसले आहेत. मोठी लोकं गेली त्या मार्गाने जावं असं म्हणतात. आता तुम्ही यांना मोठं मानता की नाही माहीत नाही. पण जर हे चुकीचं असेल, तर तुमचे नेतेही गुन्हेगार आहेत असं बोला. आधी मोदी, अमित शाह गुन्हेगार आहेत हे बोला. मग उद्धव ठाकरे गुन्हेगार आहेत हे बोला,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणीस आणि भाजपाची कोंडी केली.

हेही वाचा : ‘योगा डे’चा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, म्हणाले, “तुमच्या कुटुंबावर बोलावं लागलं, तर…”

व्हिडीओ पाहा :

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे हे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून युतीच्या चर्चा करीत असल्याचे पाहून अचंबित झाल्याचा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला होता.

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, आपला परिवार वाचवण्यासाठी विरोधकांची आघाडी तयार करण्यात येत आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावरून सातत्याने भाजपाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे हे मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून युतीची चर्चा करत होते, हे पाहून आश्चर्य वाटलं.”

“सर्वोच्च मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री नाही हीच पोटदुखी”

यावेळी उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा आरोप आणि शिवसैनिक सुरज चव्हाणवरील ईडी कारवाई यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकार कोविड काळातील भ्रष्टाचार काढत आहेत. त्यांनी तो जरूर काढावा. करोना काळात देशभरात जेवढे सर्व्हे झाले त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आलं. ही यांची पोटदुखी आहे. भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्याचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्र्याच्या यादीत आलेलं नव्हतं. त्यामुळेच त्यांची पोटदुखी आहे.”

“भाजपाला घोड्याचंच औषध द्यावं लागेल”

“भाजपाच्या पोटदुखीसाठी त्यांना निवडणुकीत जमालगोटा द्यायचाच आहे. कारण त्यांना घोड्याचंच औषध द्यावं लागेल. त्यांचा कोठा एकदाच साफ करावा लागेल,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला.

हेही वाचा : उद्धव ठाकरे मुफ्तींच्या बाजूला बसल्याने भाजपची टीका

“करोना काळातील घोटाळा म्हणत बोभाटा सुरू आहे. त्या सुरजवर धाड टाकली. सुरज एक साधा शिवसैनिक आहे. ठाकरे कुटुंबाला धक्का, असं म्हणतात,” असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray comment on sitting with mehbooba mufti in patana pbs
Show comments