मंत्रालयावर आणि दादरवर पुन्हा एकदा भगवा फडकावण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आकाश पाताळ एक करेन, सर्व शक्ती पणाला लावेन, असा निर्धार शिवसेनेचे पक्षअध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला. आजकाल कुणाला टाळी देण्याचीही भीती वाटते, असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
दादरवासीयांतर्फे झालेल्या कार्यक्रमात बोलताना उद्धव यांनी राज्यात संघर्ष करत असताना शिवसेनेची जन्मभूमी असलेल्या दादरच्या रहिवाशांनी पूर्णपणे पाठीशी राहायला हवे होते, असे सांगत दादरमध्ये शिवसेनेचा पराभव झाल्याबद्दल अप्रत्यपरित्या खेद व्यक्त केला. विधानसभा आणि नंतर महानगरपालिका निवडणुकीतही दादरमध्ये सेनेचा पराभव होऊन मनसेचा विजय झाल्याबद्दल दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही खंत व्यक्त केली होती. तर नुकताच उद्धव यांनी टाळीसाठी पुढे केलेला हात राज ठाकरे यांनी नाकारला. या पाश्र्वभूमीवर उद्धव यांनी दादर जिंकण्याचा हा निर्धार व्यक्त केला आहे.

आमच्याकडे मुकेशभाईही येतात..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांच्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या भेटीच्या बातम्यांना मिळालेल्या प्रसिद्धीवर उद्धव यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. रतन टाटा भेटायला आले यात काय बातमी आहे? आमच्याकडे टाटाच काय मुकेशभाईही भेटायला येत असतात, असे सांगत त्यांनी राज यांना टोला लगावण्याचा प्रयत्न केला.

Story img Loader