राज्यात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे विरूद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरू आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एका शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला आहे. ”गद्दारांमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही.” असं ते म्हणाले.
हेही वाचा – “सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या”; नितीन गडकरींचा मोदी सरकारला घरचा आहेर
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
”गेल्या काही दिवसांपासून असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र येत आहेत. आज तुम्हीही घेऊन आला आहात. मी याला आपल्या विजयाचा पहिला टप्पा मानतो. यानिमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, की उद्या न्यायालयात जे व्हायचं ते होऊ दे, मला न्याय देवतेवर विश्वास आहे. तसेच जनतेच्या भावना आपल्या बरोबर आहेत. जनता फक्त निवडणुकीची वाट बघत आहे. मात्र, निवडणुकीला सामोरे जाण्याची गद्दारांची हिंमत नाही. गद्दारांना जनताच धडा शिकवेल”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी –
दरम्यान, उद्या शिवसेनेतील फूटप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. ७ ऑगस्ट रोजी शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या पाच याचिकांवर सरन्यायाधीश व्ही. एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ झाली. या प्रकरणावर सखोल कायदेशीर युक्तिवाद होण्याची गरज असेल तर हे प्रकरण व्यापक घटनापीठाकडे देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे मत गेल्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीशांनी मांडले होते. त्यामुळे या प्रकरणी घटनापीठ स्थापन करण्यासंदर्भात न्यायालय काय निर्णय देते, याकडे दोन्ही गटांसह राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून, त्याआधी निर्णय होण्याची आशा शिवसेनेला आहे.