निर्भया पथकासाठी खरेदी करण्यात आलेली वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर येताच विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार आदित्य ठाकरेंनंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या मुद्यावरून शिंदे सरकारला लक्ष केलं आहे. हा अत्यंत नीच प्रकार असल्याचे ते म्हणाले. ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“निर्भया पथकातील वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जाणं हा अत्यंत नीच प्रकार आहे. निर्भया पथक कशासाठी नेमली गेली हे सर्वांना माहिती आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तत्काळ मदत मिळावी, सरकार्य मिळावे, त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखले जावे, त्यासाठी ही पथकं तयार करण्यात आली होती. आज त्या पथकातल्या गाड्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येत असेल, तर त्यांची वृत्ती काय आहे, हे आता लोकांना कळले पाहिजे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
हेही वाचा – “कर्नाटकचे मुख्यमंत्री माज आल्यासारखं…”, सीमावादावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकनाथ शिंदेंवरही साधला निशाणा
यावेळी बोलताना त्यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरूनही राज सरकारला लक्ष केलं. “एका बाजुला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटला आहे. महाराष्ट्राच्या बाजुने कुणीच बोलत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री अतिशय मस्तीत किंवा माज आल्यासारखं बोलत आहेत. काल त्यांनी कहर केला. आपले मुख्यमंत्री मात्र त्यांना स्क्रीप्ट लिहून दिले, तेवढंच बोलत आहेत. हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे, असंच ते म्हणत आहेत. पण महाराष्ट्र जसा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे, तसंच कर्नाटकनेही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट बघायला काय हरकत आहे,” असही ते म्हणाले.