मुंबई : भाजप नेत्यांनी देशात धर्मांधतेचे विष कालविले आहे. देशाला ही जातीयता भारी पडणार आहे. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन एक होण्याची गरज आहे. सर्वांचे डोळे उघडण्याची हीच वेळ आहे. धर्मांधतेची विषवल्ली पेरणाऱ्यांना दूर ठेवले पाहिजे, अशी कठोर टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

भाजप नेत्यांनी प्रभू रामचंद्रांप्रमाणे वागावे, असा सल्लाही ठाकरे यांनी भाजपच्या वर्धापन दिनानिमित्ताने शुभेच्छा देताना दिला.शिवसेनेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शिवसंचार कॉल सेंटर’ उपक्रमाचे उद्घाटन ठाकरे यांनी केले. मृत्यू पावल्यानंतर एकत्र येण्यापेक्षा जिवंत असताना एक झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या समस्त हिंदू एक होण्याच्या विधानावर व्यक्त केली.

प्रभू रामाचे नाव घेण्याची पात्रता भाजपच्या नेत्यांमध्ये नाही. वक्फ बोर्डाच्या जमिनी घेऊन त्या उद्याोगपती मित्रांना दिल्या जाणार आहेत. वक्फ बोर्डानंतर ख्रिश्चन, गुरुद्वारा, जैन आणि हिंदू मंदिराच्या जमिनीदेखील घेऊन त्या उद्याोगपती मित्रांना दिल्या जाणार आहेत. त्यासाठी जाती-धर्मांत भांडणे लावली जात आहेत. उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख शिवसेना (ठाकरे)