भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा मोठा दावा केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी होणार नसेल, तर मिधेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला. ते मंगळवारी (११ एप्रिल) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आमच्याकडच्या मिंधेंनी सत्तेसाठी लाचर होऊन लाळघोटेपणा केला आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले असा आरोप करत भाजपाचे पाय चाटायला गेले. आता त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा मिंध्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे.”
“बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांची चाटत आहेत”
“आता हे कुणाला जोडे मारणार आहेत की स्वतःच जोड्याने आपलं थोबाड फोडून घेणार आहेत? कारण ते केवळ आणि केवळ सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांची चाटत आहेत. त्यांनी काय चाटायचं ते चाटावं, आम्ही बघायलाही येणार नाही. मात्र, एवढं बोलल्यावर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नका. हे बाळासाहेबांचे विचार नाहीत,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.
“आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही”
“एका बाजूला मोहन भागवत मशिदीत जात आहेत. आता मदरशांमध्ये जाऊन हे कव्वाली ऐकणार आहेत. दुसरीकडे बाबरी आम्हीच पाडली म्हणून सांगणार आहेत. याचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? मी सांगतो की, आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तसं भाजपाने एकदा स्पष्ट करावं की, याचं नेमकं हिंदुत्व काय आहे?” असाही सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.