दुष्काळग्रस्तांसाठी सरकारची मदत कमी पडत असल्याचे मत व्यक्त करीत प्रदर्शनातील छायाचित्रे विकून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्याला मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाने शेतकऱ्यांना अपुरी मदत मिळत असल्याबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी प्रदर्शन संपल्यावर उद्धव ठाकरे राज्यव्यापी दौराही करणार आहेत.
राज्यात हजारो गावांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती असून अवकाळी पाऊस व गारपिटीनेही हजारो गावांना फटका बसला आहे. सरकारची मदत अजून शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. या पाश्र्वभूमीवर दुष्काळग्रस्तांच्या मदतीबद्दल पत्रकारांनी विचारले असता ठाकरे म्हणाले, सरकारची मदत कमी आहे. माझ्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असल्याने आता मी ती विकून निधी उभा करणार आहे. त्यातून काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात यश मिळाले, तरी मला समाधान मिळेल.
छायाचित्रांचे प्रदर्शन
उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन ६ ते १२ जानेवारी दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. ज्येष्ठ तबलावादक झाकीर हुसेन यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन केले जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांचे मत वैयक्तिक -खडसे
शिवसेना सत्तेत सहभागी असताना दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारची मदत कमी असल्याचे मतप्रदर्शन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याने खळबळ माजली असून ठाकरे यांचे मत वैयक्तिक असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.