राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुंबईत भेट झाल्यानंतर दोघांनीही केंद्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. देशात राज्याराज्यांमध्ये चांगलं वातावरण राहिलं पाहिजे, असं मत व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकजण आपआपला हेतू ठेवून पुढे चालला तर राज्य आणि देश खड्ड्यात जाईल, असा इशारा दिला. तसेच हे राजकारण देशाला परवडणार नाही, असंही नमूद केलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरले आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणाला १००० किलोमीटरची एकत्रित सीमारेषा असल्याचा उल्लेख झाला. आम्ही सख्खे शेजारी आहोत. देशात राज्याराज्यांमध्ये चांगलं वातावरण राहिलं पाहिजे. नाहीतर प्रत्येकजण आपआपला हेतू ठेऊन पुढे चालेल आणि राज्य गेलं खड्ड्यात, देश गेला खड्ड्यात अशी परिस्थिती निर्माण होईल. हे राजकारण देशाला परवडणारं नाही.”

“देशाच्या मुलभूत प्रश्नांना हात न घालता दुसऱ्यांना बदनाम करण्याचा प्रकार सुरू”

“आज एका नव्या विचाराची सुरुवात झालीय. त्याला आकार यायल जरूर थोडा अवधी लागेल. देशाच्या मुलभूत प्रश्नांना हात न घालता दुसऱ्यांना बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. मी काय केलं हे न सांगता तुम्ही काय नाही केलं हे खोट्या पद्धतीने सांगितलं जातंय. हा कारभार मोडायला पाहिजे. त्यासाठी आम्ही दोघांनी मिळून एक दिशा ठरवली आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“या भेटीत आम्ही काही लपवल्यासारखं ठेवलेलं नाही”

उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार, भेटणार अशा चर्चा होत्या, बातम्याही येत होत्या. तो दिवस आज प्रत्यक्ष उजाडला. चंद्रशेखर राव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. कालच शिवरायांची जयंती होती आणि दुसऱ्याच दिवशी ही भेट होत आहे. या भेटीत आम्ही काही लपवल्यासारखं ठेवलेलं नाही. आतमध्ये काहीतरी बोलायचं आणि बाहेर येऊन सदिच्छा भेट होती असं म्हणायचं असं नाही.”

“अत्यंत खालच्या पातळीवर सुडाचं राजकारण सुरू”

“संजय राऊत आणि चंद्रशेखर राव यांनी जसं म्हटलं की देशातील वातावरण दिवसागणिक गढुळ होत चाललं आहे. राज्यकारभार दूर राहिला, पण अत्यंत खालच्या पातळीवर सुडाचं राजकारण सुरू झालं आहे. सुडाचं राजकारण ही काही आपल्या देशाची परंपरा नाही आणि हे आमचं हिंदुत्व तर अजिबात नाही. या गोष्टी अशाच चालू राहिल्या तर शेवटी देशाला भविष्य काय?” असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

हेही वाचा : “स्वतःचं मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी एका रात्रीत बायकोचे १९ बंगले तोडले आणि…”, सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

“जे आहे तसं मागील पानावरून पुढे चालू ठेवायचं असेल तर कोणी मुख्यमंत्री बनेल, कोणी पंतप्रधानपदावर बसेल, पण देशाचं काय होईल हा विचार कोणीतरी करायला पाहिजे होता. तो विचार आजपासून आम्ही करायला सुरुवात केलीय. आज आम्हाला नव्याने साक्षात्कार झालाय असा काही भाग नाही, पण सुरुवात कोणी करायची, तर ती सुरुवात आम्ही करतो आहोत,” असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray first reaction after meeting with telangana cm kcr in mumbai pbs