राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई व महाराष्ट्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान केला आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तसेच त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला चढवला. ते शनिवारी (३० जुलै) मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या दोन-अडीच वर्षांच्या काळात सुंदर लेण्या, शिवरायांचे गड-किल्ले व इतर सर्व चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील. मात्र, आता त्यांना कोल्हापुरचा जोडा दाखवण्याची देखील वेळ आली आहे. कारण कोल्हापुरी जोडा हेही महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याचा अर्थ कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, जगप्रसिद्ध कोल्हापुरी जोडे कोश्यारींना दाखवण्याची वेळ आली आहे.”
“मुंबई हक्काने मिळवली, कोश्यारींनी आंदण दिलेली नाही”
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही ठिकाणी राज्यपाल तत्परता दाखवतात. राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत त्यांचा आपल्याला अनुभव आहे. आज मात्र त्यांनी कहर केलाय. महाराष्ट्राची ओळख जगाला आहे, पण राज्यपालांना नाही याची खंत आहे. मुंबई ही हक्काने मिळवली आहे, कोश्यारींनी आंदण दिलेली नाही. परदेशी पत्रकारांनी मुंबईवर लिहिलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रासाठी १०५ नव्हे, तर २००-२५० लोकांनी बलिदान दिले आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“कोश्यारींनी सावित्रीबाई फुलेंविषयी देखील हिणकस उद्गार काढले होते”
“मी मुख्यमंत्री असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लॉकडाऊन असतानाही सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याची घाई झाली होती. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी त्यांनी हिणकस उद्गार काढले होते. त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान केला आहे,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
हेही वाचा : “५० खोकेवाले आता…”, राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले होते?
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”