पुढील वर्षी राज्यात आणि देशभरात अनुक्रमे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आत्तापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप करताना सर्वपक्षीय नेतेमंडळी आक्रमक होताना दिसत आहेत. सोमवारी मुंबईची पावसामुळे झालेली तुंबई पाहण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणीसाठी रस्त्यावर उतरले. मात्र, यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरू झाला आहे. शिंदेंच्या मुंबई भेटीवर ठाकरे गटाकडून आता तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत एका तासात ७० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे मिलन सब-वे, अंधेरीसह काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोमवारी मिलन सब-वेला भेट दिली. यावेळी मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याबाबत माध्यमांनी प्रश्न केला असता मुख्यमंत्र्यांनी “पाऊस आला त्याचं स्वागत करा, साचलेल्या पाण्यावर काय बोलताय?” अशा आशयाचं विधान केलं. त्यावरून आता सामनातील अग्रलेखातून ठाकरे गटानं हल्लाबोल केला आहे.
“पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडविली आहे आणि त्यात मिंधे सरकारचे सगळे दावे वाहून गेले आहेत. अस्मानी आणि सुलतानी या कोंडीत पुढील दोन-तीन महिने आपला श्वास गुदमरणार, अशी भीती मुंबईकर जनतेला वाटत आहे. शनिवारी रात्री मुंबईत एका तासात 70 मिलिमीटर पाऊस कोसळला हे खरे असले तरी राणाभीमदेवी थाटात केलेले सरकारचे नालेसफाईचे दावे पोकळच ठरले. यावेळी पाणी तुंबणार नाही, मुंबईकरांना त्रास होणार नाही, असेही वादे मिंधे-फडणवीस सरकारने जोरशोरात केले होते. मात्र हे वादे म्हणजे फेकूगिरी होती हे शनिवारी दिसले”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
२४ तासांत मुंबईत आल्या १२०० तक्रारी!
“७० मिलीमीटर पावसामुळे जर मुंबईची ही दशा होत असेल तर पुढील दोन-तीन महिन्यांत आपली काय दुर्दशा होणार? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. त्यात मुंबईकरांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांनाच‘तक्रारी काय करता, पावसाचे स्वागत करा,’ असा अजब ‘सल्ला’ मुख्यमंत्री मिंधे यांनी दिला आणि जनतेच्या जखमेवर मीठच चोळले. वास्तविक, २४ तासांत तब्बल १२०० तक्रारी जनतेला का कराव्या लागल्या यावर मिंधे-फडणवीस सरकारने चिंतन करायला हवे”, अशा शब्दांत ठाकरे गटानं एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
पवार-फडणवीस शाब्दिक चकमक; ओबीसींचा मुद्दा, तत्कालीन पुलोद सरकारवरूनही आरोपांची राळ
“पाणी तुंबणे आणि इतर गोष्टींबाबत आपण केलेल्या वल्गना पहिल्याच पावसाने पोकळ का ठरल्या, आपल्या कारभाराचे पितळ ७० मिलीमीटर पावसाने उघडे कसे पाडले याची लाज सरकारला वाटायला हवी. मात्र त्याऐवजी ‘पावसाचे स्वागत करा, तक्रारी करू नका,’ असे जनतेलाच सांगणे हा ‘चोर तर चोर, वर शिरजोर’ अशातला प्रकार झाला”, असा टोला ठाकरे गटाकडून लगावण्यात आला आहे.
‘त्या’ घोषणेचं काय झालं?
‘जिकडे पाणी तुंबले तिकडच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू आणि जिकडे तुंबणार नाही तेथील अधिकाऱ्यांचा सत्कार करू,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले. आता याला ना ‘इशारा’ म्हणता येईल, ना ‘गाजर.’ ही फक्त बनवाबनवी आहे. मिंधे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात फक्त बनवाबनवीचाच खेळ सुरू आहे”, असं नमूद करत एकनाथ शिंदेंनी केलेल्या घोषणेची आठवण ठाकरे गटानं करून दिली आहे.