मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातून शिवसेनेत (शिंदे गट) होणाऱ्या प्रवेशांनी ठाकरे गटाची चिंता वाढवली आहे. शिवसेनेतील फुटींनंतर अनेकजण शिंदे गटात प्रवेश करू लागले असून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचे दिसते आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबई, पुणे व रायगड येथील उद्धव ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात मोठ्या संख्येने प्रवेश होत आहेत. त्याचा फटका उद्धव ठाकरे गटाला बसत आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील जवळपास ५० माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. गुरुवारी देखील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून ठाकरे गटाला रामराम केला. उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आणि बारामतीच्या जिल्हाप्रमुख कल्पना थोरवे, विधी विभागाचे प्रमुख संभाजी थोरवे, पुणे उप शहरप्रमुख नितीन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आगरी कोळी समाजाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोहर ठाकूर, उरणचे योगशे बापर्डेकर यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला. तसेच उद्धव ठाकरे गटाच्या दैनंदिनीची निर्मिती करणारे साकेत पवार त्यांचे अन्य सहकारी स्वप्नील माने, सुनील जाधव, रुपेश सुर्वे यांनीही गुरुवारी शिंदे गटात प्रवेश केला. मानव आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य नयन सिंग, महेश शर्मा, संजय सोलंकी, जगदिश कुमावत, सुरेश चौधरी, प्रवीण चौधरी, सिताराम चौधरी, दिनेश चौधरी, नरेश प्रजापती, राजेंद्र मुळे, संजय देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी देखील शिवसेनेमध्ये दाखल झाले. या पक्ष प्रवेशावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला. मंगळवारी दापोलीचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजी नगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासह मुंबईतील तीन माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच, मुंबईतील भांडुपमधील माजी नगरसेवक उमेश पाटील, चेंबूरच्या माजी नगरसेविका अंजली नाईक आणि गोरेगाव येथील माजी नगरसेविका लोचना चव्हाण यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला.