मुंबई : महापालिकेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत.ठाकरे गटाकडे महापालिकेची सत्ता असतानाच्या करोनाकाळातील गैरव्यवहारांबाबत भारताचे महालेखापाल आणि महानियंत्रक (कॅग) यांनी ठपका ठेवल्यानंतर राज्य सरकारने पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली तर केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचनालनालयाने चौकशी सुरू केली आहे. त्यातून ठाकरे गट अडचणीत येणार आहे. राजकीय सूडबुद्धीने चौकशी केली जात असल्याचा आरोप करून ठाकरे गटाकडून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मेट्रो चित्रपटगृहापासून पालिकेपर्यंत दुपारी चार वाजता हा मोर्चा काढला जाईल, असे खा. अरिवद सावंत यांनी सांगितले.
मोर्चास कारण..
महापालिकेत वर्षभर प्रशासकांकडून कारभार केला जात असून या काळात सिमेंट काँक्रीटचे रस्ते, खडी, डांबरीकरण आदींमध्ये कोटय़वधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी वेळोवेळी केला होता. मात्र त्याची दखल घेऊन चौकशी न झाल्याने याविरोधात आवाज उठविण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पालिकेच्या ८८ हजार कोटी रुपयांच्या ठेवींवरही भाजप-शिंदे गटाचा डोळा असल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला आहे.