मुंबई : विधानसभेची पोटनिवडणूक अंधेरी पूर्व या मतदारसंघापुरती असली तरी यानिमित्ताने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मशाल या निवडणूक चिन्हाचा संपूर्ण मुंबईत घराघरांत प्रचार करण्याचा विडा उचलला आहे. ठिकठिकाणी मशाल यात्रा काढण्यात येत असून दिवाळीच्या तोंडावर उटण्याच्या पाकिटाच्या माध्यमातून मशाल निवडणूक चिन्हाविषयी जागृती करण्यात येणार आहे. तसेच कंदील, दिवाळी भेट यावरही मशाल हे चिन्ह ठळकपणे दर्शवले जाणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> तुमच्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये नाराजी आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत…”

अंधेरीच्या पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली असली तरी ही पोटनिवडणूक होणार आहे.  मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ठाकरे गटातील मुंबईतील सर्व कार्यकर्ते सरसावले आहेत. यावेळी प्रथमच उद्धव ठाकरे गट हा मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवणे हे ठाकरे यांच्या शिवसेनेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. विविध विभागातील कार्यकर्ते सकाळ-संध्याकाळ घरोघरी फिरून मशाल या निवडणूक चिन्हाचा प्रचार करणार आहेत.

पालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली, उमेदवार कोण हे ठरलेले नसले, प्रभाग पुनर्रचना, आरक्षण हे सगळेच विषय अडकलेले असले तरी मशाल हे चिन्ह नक्की झाल्यामुळे या चिन्हाचा प्रचार शिवसैनिकांनी सुरू केला आहे. सायन कोळीवाडा परिसरात काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी मशाल यात्रा काढली होती.

हेही वाचा >>> Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी, एनसीबीच्या अहवालातून खुलासा

 शिवसेनेतर्फे दरवर्षी दिवाळीत घरोघरी उटण्याची पाकिटे वाटली जातात. ही शिवसेनेची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्याचा उपयोग प्रचारासाठी केला जात आहे. उटण्याच्या पाकिटाच्या माध्यमातून मशाल चिन्हाचा प्रचार करीत असल्याचे  माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

 पालिका निवडणुकीत उमेदवार कोणीही असला तरी शिवसेनेचे मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तर शिवडीमधील माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले की, आमच्या विभागात सुमारे दहा हजार मराठी घरे आहेत. या घराघरांत शिवसैनिक  उटण्याची पाकिटे देणार आहेत. तसेच पाकीट देताना मशाल चिन्हाची ओळखही सांगितली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीला चाळींच्या प्रवेशद्वारावर मोठे कंदील लावण्याची प्रथा असते. त्यावरही यंदा मशाल झळकवण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray group promote election symbol mashaal across in mumbai during andheri campaign zws
First published on: 19-10-2022 at 05:51 IST