राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा. तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. उद्धव ठाकरे गटदेखील आक्रमक झाला असून आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे पाणी साधे नाही. आम्ही राज्यपाल कोश्यारी यांना पाणी पाजल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वीर सावरकरांवरील वक्तव्यानंतर राज्यात संताप, आता राहुल गांधींचा थेट संजय राऊतांना फोन, कोणत्या विषयांवर चर्चा?

“शिवसेना राज्यभरात आंदोलन करत आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान केले आहे. शिवाजी महाराज आज तसेच येणाऱ्या काळातही सर्वांचेच आदर्श असतील. ते फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. कोश्यारी महाराष्ट्रातील महापुरूषांविषयी विधाने करत आहेत. कोश्यारी दिल्लीतील बादशहाच्या इशाऱ्यावर अशी वक्तव्ये करतात का? ते महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या महाराष्ट्राचे पाणी साधे नाही. कोश्यारी यांना पाणी पाजल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही,” असा थेट इशारा अंबादास दानवे यांनी दिला.

हेही वाचा >>> प्रकाश आंबेडकर मंचावर असताना उद्धव ठाकरेंचे विधान, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले “…हे आमचे हिंदुत्व नाही, अजिबात नाही!”

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी शिवसेनाला कोणीही शिकवण्याची गरज नाही. आम्ही लाखो सह्यांचं निवेदन याधीच राष्ट्रपतींना दिलेलं आहे. या पत्रात आम्ही सावरकरांना भारतत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काही लोक गळा काढत होते. मात्र काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. त्यानंतर ते रस्त्यावर उतरले नाहीत. म्हणजेच त्यांचे हिंदुत्व हे बेगडी आहे,” अशी टीका दानवे यांनी केली. ते (भाजपा) छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करतात का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >>> वीर सावरकरांवरील वक्तव्यानंतर राज्यात संताप, आता राहुल गांधींचा थेट संजय राऊतांना फोन, कोणत्या विषयांवर चर्चा?

“सावरकरांविषयी ते रस्त्यावर उतरतात. मात्र छत्रपतींविरोधात वक्तव्य केल्यानंतर रस्त्यावर उतरताना तुमची दातखिळी बसते का? महाराष्ट्र महापुरुषांची जननी आहे. देशभक्त, स्वातंत्र्यवीरांची जननी आहे. तरीदेखील महाराष्ट्राची प्रतिमा मलीन केली जात आहे,” अशी टीका दानवे यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray group protest in mumbai against bhagat singh koshyari ambadas danve criticize bjp and devendra fadnavis prd