मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षानाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. ‘शिवसेना’ पक्षानाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह आमचं असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भातील कागदपत्रे व लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यानुसार आज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली. ते टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “संजय राऊत हा असा व्यक्ती आहे, की राहुल गांधींचा आणि शरद पवारांचा फोटो शिवसेना भवनात…” संजय शिरसाटांचं टीकास्त्र!

काय म्हणाले अनिल देसाई?

“२१ जूनपासून जो घटनाक्रम घडला, तो सर्व घटनाक्रम आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी युक्तिवादात केला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबरोबरच यापूर्वी निवडणूक आयोगापुढे झालेल्या सुनावणीतील मुद्द्यांचाही समावेश आहे. याचबरोबर शिंदे गटाने ज्या प्रकारे शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता, तो दावा नेमका कसा चुकीचा आहे, हेदेखील आम्ही या युक्तिवादात मांडलं” असल्याची माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.

हेही वाचा – “घरोबा एकाबरोबर आणि संसार…”, राधाकृष्ण विखे-पाटलांची महाविकास आघाडीवर खोचक टीका!

“निकाल आमच्याच बाजुने लागेल”

“आमदार खासदार सोडून गेल्याने पूर्ण पक्ष त्यांचा होत नाही. पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो. पक्षाची विचारधारा आणि पक्षाचे नेतृत्व या गोष्टी बघून मतदार मतदान करत असतात. त्यामुळे एखाद्या आमदार-खासदाराने ही जनताच माझी आहे म्हणणं, हा दावाच मुळात चुकीचा आहे. या सर्व गोष्टी आम्ही कायद्याच्या चौकटीत बसवून निवडणूक आयोगापुढे मांडल्या” असल्याचेही ते म्हणाले. आम्ही तीन लाख प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. तसेच २० लाख प्राथमिक सदस्यत्वाचे पुरावे दिले आहेत. त्यानुसार शिंदे गटाने काय पुरावे दिले, याची पडताडणी करा आणि आम्हाला न्याय द्या, अशी मागणी आयोगापुढे केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच हा निकाल आमच्याच बाजुने लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray group submits written argument to election commission on shivnsena dispute spb