विठ्ठलाच्या भूमीत राम मंदिराचा गजर

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून हिंदुत्व आणि राम मंदिराच्या मुद्दय़ावर आक्रमक झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येनंतर बरोबर एक महिन्याने सोमवार २४ डिसेंबर रोजी पंढरपूरच्या दौऱ्यावर जात आहेत. ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यातील सभेत शिवसैनिकांसह वारकरी संप्रदायाला मोठय़ा प्रमाणात सहभागी करून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे नेते, कार्यकर्त्यांनी ताकद पणाला लावली आहे.

राम मंदिराच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबरला अयोध्येचा दौरा केला. त्यानंतर राम मंदिराच्या प्रश्नावर कुंभकर्णी झोपेत असलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी २४ डिसेंबरला पंढरपूर दौरा करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर या दौऱ्यात मोठय़ा संख्येने वारकरी संप्रदाय सहभागी व्हावा यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात आले. दुपारी दोन वाजता पंढरपुरात उद्धव ठाकरे यांची सभा होईल. तत्पूर्वी ते विठ्ठलाचे दर्शन घेतील.

बिहारमधील जागावाटपामुळे शिवसेनेच्या गालावर हसू

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमधील पराभवानंतर शिवसेनेचे युतीमधील महत्त्व आणखी वाढले आहे. भाजप-शिवसेनेत विधानसभेच्या जागावाटपावरून मुख्य तिढा आहे.  रविवारी बिहारमध्ये भाजपने संयुक्त जनता दल आणि राम विलास पासवान यांच्याशी युती करताना २०१४ मध्ये जिंकलेल्या जागा सोडल्या. गेली चारवर्षे मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देणारा भाजप लोकसभा निवडणुकीत युतीसाठी तडजोड करत असल्याचे पाहून शिवसेनेच्या गालावर हसू उमटले आहे. जिंकलेल्या जागा सोडण्याची कृती भाजपची हतबलता दाखवून देत असल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.

Story img Loader